Corona Impact: ग्रामीण व्यवसाय पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात; व्यवसायांना नियम आणि अटींचा ब्रेक

corona updates
corona updates

आडुळ (औरंगाबाद): मागच्या वर्षी कोरोनामुळे जवळपास देशोधडीला लागलेली ग्रामीण बाजारपेठ अनलॉक सुरु झाल्यानंतर वेग धरीत असतानाच परत राज्यात कोरोनाने डोके वर काढल्याने राज्य शासनाच्या सुचनेनुसार प्रशासन कोरोना नियत्रणांसाठी शहरासह ग्रामीण भागातील व्यवसायांना नियम व अटी लागू केल्या असून व्यवसायिकांना मोठी बंधने घातली आहे. शिवाय लग्नकार्यासह इतर कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घातल्याने वेग धरलेल्या ग्रामीण व्यवसायाला पुन्हा घरघर लागली आहे.

आडुळ (ता.पैठण) सह तालुक्यात कोरोना नियंत्रणासाठी मागच्या आठवड्यात तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पैठण येथे तालुकास्तरावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन तालुक्यातील सर्व आठवडी बाजार दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले. शिवाय लग्न समारंभात ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याच्या सुचना देऊन सर्व प्रकारच्या राजकिय पक्ष, संघटना यांना आंदोलनासाठी मनाई करण्यात आली आहे. स्थानिक बाजारपेठेतील दुकानदारांनी कोरोना संदर्भातील मास्क, सॅनिटाइजर, शारिरीक अंतर संदर्भातील सर्व नियम काटेकोर पणे पाळावे असे आदेश देण्यात आले.

विना मास्क फिरणाऱ्यावर ही ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जिल्ह्यात ही मागच्या आठवड्यापासून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुन्हा मागच्या वर्षी प्रमाणे लॉकडाउन लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लग्न कार्य व इतर कार्यक्रमांना संख्येची अट घातल्याने पुन्हा ग्रामीण बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. अचानक कोरोनाच्या धास्ती ने धंदा मंदावल्याने ग्रामीण व्यवसायिक मेटाकुटीला आले आहे. 

लग्न सराई ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा
अनलॉकनंतर ग्रामीण भागात या महिन्यापासूनच लग्नसराई धुमधडाक्यात होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडलेले ग्रामीण भागातील मंगल कार्यालय, कापड दुकान, फर्निचर, मंडप, ब्रॉड बॉन्ड, स्वयंपाकी, फोटोग्राफीसह लग्नसराई निमित्त हंगामी व्यवसाय करणारे शैकडो लहान व्यवसायिक यंदा मागच्या वर्षीची तुट भरुन काढू या तयारीत असतांच अचानक तालुका प्रशासनाने तालुक्यात पंधरादिवसाचे लॉकडाऊन लावल्याने या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

लग्नसराईच्या तारखा बुक मात्र पुढे काय व्यवसायिक चिंताग्रस्त
मागच्या वर्षी कोरोनामुळे या व्यवसायाला देखील मोठा फटका बसला होता. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने लग्नकार्य धुमधडाक्यात सुरु झाली होती. त्यामुळे मंडप डेकोरेटर, स्वयंपाकी, मंगल कार्यालयाप्रमाणेच छायाचिञकार यांच्या तारखा बुक होण्यास सुरुवात झाली असतांना अचानक लॉकडाऊन सुरु झाल्याने मागच्या वर्षीचा तर व्यवसाय बुडाला मात्र आता पुढे काय असा प्रश्न या व्यवसायिकांना पडला आहे. 

मी गेल्या अनेक वर्षापासुन पासुन फोटो व व्हिडीओ शुटिंगचा व्यवसाय करतो, मोबाईलमुळे आमचा व्यवसाय अगोदरच कमी झाला त्यात मागच्या वर्षी कोरोनाने घरातच बसविले आताच काही ऑडर बुक केल्या होत्या आता परत लॉकडाऊन सुरु झाल्याने चिंता वाढली आहे..सय्यद नजीर (एसएम फोटो स्टुडिओ, आडुळ)

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com