लाज नको, मराठीला साज हवा...!

marathi bhasha din
marathi bhasha din

औरंगाबाद:

‘‘आमुच्या मनामनात दंगते मराठी 
आमुच्या रगारगात रंगते मराठी 
    आमुच्या उराउरात स्पंदते मराठी 
       आमुच्या नसानसात नाचते मराठी’’ 

कविवर्य सुरेश भट यांच्या मराठीविषयीच्या या भावना. ही कविता ऐकताच स्फुरण चढते. भाषा अभिमान जागा होतो. मराठीवरचे प्रेम उफाळते; पण जसे अग्नीवर तप्त दूध फक्त उफाळून येते तशीच भावना हल्ली मराठीजनांत झाली आहे. अर्थात मराठीची दशाही कविवर्यांनी मांडली.

‘‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी.’’ हे वास्तव तितकेच विदारकही. मराठीची जिथे तिथे अवहेलना होत आहे. बहुधा ती आपल्या हातूनच नकळत होत आहे. इंग्रजी येत नाही म्हणून स्वतःच्याच मराठीची लाज वाटावी अशीही उदाहरणे दिसतात. कधी इंग्रजी शाळेत तर कधी इंग्रजी भूत डोक्यात शिरलेल्यांच्या मनात, कधी व्यवहारात व अगदी घरातही अवहेलना होताना दिसते.

भाषा समृद्ध व्हायला हवी; पण ती सहज होणार नाही. त्यासाठी अभ्यास, संशोधन, वाचन चळवळीची, मराठीतील व्यवहाराची गरज आहे. केवळ राजभाषा नव्हे तर ती इतर भाषाभगिनी व मराठी जनांची खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा व्हायला हवी. आपल्या संवादवाहिनीची श्रीमंती कशी वाढवता येईल, अभिजात असण्यासोबतच ती आगामी पिढ्यांसाठी समृद्ध कशी होईल याबाबत मराठीची ज्ञानआराधना करणाऱ्या विचारवंतांची मते... 

भाषा समृद्धीसाठी आपण काय करतो? 
दासू वैद्य (प्रसिद्ध कवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख): मराठी भाषा व्यवहारात यायला हवी. त्यातून चरितार्थ चालायला हवा. इंग्रजी भाषा शिकला तर उपाशी मरणार नाही ही आपल्याकडे धारणा आहे. इंग्रजी आली की काही भीती नाही. मराठी, बाकीच्या भाषा शिकून काय होणार? त्यातून मराठीचा वापर आपण व्यवहारात बंद केला. मराठी माणूस इंग्रजीत सही करतो ही खंत वाटते. मराठीबद्दलचा न्यूनगंड बाजूला ठेवायला हवा. अग्रक्रमाने मराठीचा वापर करायला हवा. मराठी न शिकता नाव कमवत आहेत; पण तमीळनाडूत गेलो तर कळते की आपण मराठीबद्दल किती आग्रही आहोत व किती अग्रक्रम देतो. भाषा तेव्हाच तोंडातून बाहेर पडेल जेव्हा त्यातून पोट भरेल. उपाशीपोटी कोणतीही भाषा येत नाही. पोटाचा, भुकेचा संबंध भाषेशी आहे. जो इंग्रजीने तयार केला. त्यामुळे व्यवहारात मराठीला आणून तिचे महत्त्व तयार करावे लागेल.

वैद्यकीय व अभियांत्रिकीची पुस्तके मराठीतून काढू शकलो नाही, ही खंतच ना? निजाम सरकारने त्यांची पुस्तके उर्दूत काढली; पण मराठीत हे काम जमले नाही. इंग्रजी लोक भाषेसाठी काम करतात. दर दोन वर्षांनी नवीन शब्द शोधून ते भाषेचा शब्दकोश वाढवीत आहेत. आपल्याकडे ते होताना दिसत नाही. भाषेच्या समृद्धीसाठी आपण काय करतो? भाषा सर्वजण वापरतात ती तेव्हा ती अभिजात होते. आपल्यात आत्मविश्‍वास नाही. ही भयानक परिस्थिती मराठी माणसांच्या मानसिकतेतून निर्माण झाली व राजकीय उदासीनताही त्याला कारणीभूत आहे. 

मातृभाषेकडे दुर्लक्ष परवडणारे नाही 
आनंद उबाळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक, सदस्य अभिजात मराठी भाषा समिती, राज्य शासन) : इंग्रजी भाषा शिकवीत असलो तरीही साहित्य शिकवताना मानसशास्त्राचे सिद्धांतही शिकवावे लागतात. त्या दृष्टीने असे दिसते की, जगातील कुठल्याही व्यक्तीचे जगाबद्दलचे आकलन फक्त मातृभाषेतूनच होते. दुसऱ्या कुठल्याच भाषेतून होत नाही. मग प्रश्‍न असा आहे की, ज्या लोकांची मातृभाषा पक्की विकसित झाली, त्या माणसांच्या जगाबाबतच्या संकल्पना पक्क्या असतात, निश्‍चित ठरलेल्या असतात. मातृभाषेत शिक्षण न झालेल्या व्यक्ती अथवा त्यांची मातृभाषा कच्ची असते अशा लोकांचे जगाबाबतचे आकलनच तोडके होते. म्हणून नवनिर्मितीची क्षमता विकसित होत नाही.

मातृभाषेतून शिक्षण न झालेले अर्धा हळकुंडाने पिवळे विद्यार्थी मोठ्या पगारीची होऊ शकतील; पण ते शास्त्रज्ञ होतील, त्यांच्याकडून ज्ञाननिर्मिती होईलच असे नाही. जगातील सर्व मोठे शास्त्रज्ञ, विचारवंतांची शिक्षण मातृभाषेत झाली म्हणूनच ते नवनिर्मिती करू शकली. अनेक भाषा शिकाव्या, त्यात पारंगत व्हावे; पण जगाबाबतच्या, ज्ञानाच्या, जगण्याच्या संकल्पना मातृभाषेतूनच विकसित होतात, हे मानसशास्त्रानेही सिद्ध केले आहे. मराठी शिक्षण अत्यंत मूलगामी, महत्त्वाचे व प्रत्येक शाळांत ते सक्तीचे असायला हवे. मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. कारण त्यातून नवनिर्मिती होऊ शकणार नाही. 

भाषेवर विलक्षण प्रेम हवे 
ऋषीकेश कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक): मराठी भाषा जगातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. तिसऱ्या शतकापासून या भाषेचे अवशेष सापडतात. मराठी भाषा अत्यंत डौलदार आहे. सौंदर्य प्राप्त व्हावे अशी ही भाषा आहे; पण घरात अनाठायी अन्य भाषा बोलल्या जातात. त्यातून मातृभाषेचा विसर पडतो. भाषेच्या बाबतीत अहंकार असू नये; परंतु चिवटपणा असायला काय हरकत आहे. अन्य भाषेचे शब्द मातृभाषेत येऊ द्या, ते मातृभाषेत रुतलेले असू द्या; परंतु व्यवहार मातृभाषेतच व्हावा.

आपला भाषिक चिवटपणा आपल्यातून परागंदा झाला. चीन, रशिया, जपान अशा देशांनी त्यांची भाषा टिकवून ठेवली. ज्ञान-विज्ञान त्यांच्या भाषेतून शिकविले. परिणामी तेथील व्यक्ती निपुण झाली, अध्ययनाने भाषाही समृद्ध केली. तसे आपल्याकडे झाले नाही. इंग्रजी येणे अनिवार्य हा ठसा आपण तयार करून घेतला. मातृभाषेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांची आकलन क्षमता रुंदावेल. घर असो की बाह्यजग, व्यवहार असो की संवाद तो मराठीतूनच करायला हवे. अन्य भाषा येते व उच्चाराने मी वेगळा ही सुप्त इच्छा अनाठायी असून भाषेवर विलक्षण प्रेम असायला हवे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com