होम आयसोलेशनसाठी रोज २०० रुपये शुल्क, जास्तीचे पैसे घेणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई

Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates

औरंगाबाद : तीव्र लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला आता घरी राहून उपचार घेण्याची सूचना केली जात आहे. सध्या शहरात तीन हजारहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र, खासगी डॉक्टर रुग्णांकडून प्रत्येकी १० हजार रुपये एवढी फीस उकळत आहेत. त्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्त केला जात असून, १० हजार रुपये देण्यापेक्षा महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊ, ही प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी खासगी डॉक्टरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपचार केले तर दररोज दोनशे रुपये व प्रत्यक्षात रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी केल्यास तीनशे रुपये घ्यावेत, असा आदेश काढला आहे. ठरवून दिलेल्या फीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालये, घाटी हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालये फुल्ल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला महापालिकेतर्फे दिला जात आहे. त्याचा फायदा घेत खासगी डॉक्टर रुग्णांची लूट करत आहेत. सध्या शहरात तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. खासगी डॉक्टर्स रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क उकळत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. यासंदर्भात माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी देखील तक्रार केली होती. त्यामुळे होम आयसोलेशनसाठी खासगी डॉक्टरांनी दहा दिवसांचे प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे दोन हजार रुपये द्यावेत. रुग्णाच्या घरी दररोज व्हिजिट केली असेल तर तीनशे रुपये फी घ्यावी, असे आदेश प्रशासकांनी काढले आहेत.

नंतर विचारतही नाहीत!
काही मोठ्या रुग्णालयांमध्ये होम आयसोलेशनसाठी स्वतंत्र डॉक्टर टेबल टाकून बसलेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाला दहा दिवस उपचार देऊ, त्यापोटी दहा हजार, १२ हजार असे पॅकेज ठरविण्यात आले आहे. दहा दिवसांची औषधी आणि गोळ्या संबंधित रुग्णांना एकाच वेळी देण्यात येतात. नंतर मात्र संबंधित रुग्णाला डॉक्टर फोन करूनही विचारतही नाहीत. काही त्रास झाल्यास फोन करा, एवढेच सांगितले जाते, असे प्रकारही केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com