बसप लढणार स्वबळावर 

शेखलाल शेख
Monday, 2 March 2020

मागील महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने पाच जागांवर विजय मिळवून सर्वांना धक्का दिला होता; मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या प्रतिसादाचा फटका बसप उमेदवारांना बसला. वंचितचा फटका बसला असला तरी बसप स्वबळावर मैदानात उतरणार आहे.

औरंगाबाद : बहुजन समाज पक्षाने (बसप) महापालिका ३५ जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आतापर्यंत पक्षांकडून अनेक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. बसप महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरणार आहे. त्या अनुषंगाने पक्षाने तयारी केली असून, गत महिन्यात वॉर्ड पदाधिकाऱ्यांचा मेळावासुद्धा पक्षाने घेतला. शिवाय पक्षाचे पदाधिकारी आतापासून रोज वेगवेगळ्या वॉर्डांत जाऊन कॉर्नर बैठका घेत आहेत. एकूणच गतवेळीच्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाने अधिक जोरकसपणे तयारी केल्याचे चित्र आहे.

मागील महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने पाच जागांवर विजय मिळवून सर्वांना धक्का दिला होता; मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या प्रतिसादाचा फटका बसप उमेदवारांना बसला. वंचितचा फटका बसला असला तरी बसप स्वबळावर मैदानात उतरणार आहे.

दोन महिने घरात पुरुन ठेवला बापाचा मृतदेह

बसपने यावेळी सर्वच जागांवर लक्ष देण्याचे ठरविले असून, त्यापैकी जिथे जास्त शक्ती आहे अशा ३५ जागांवर ताकदीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः दलित-मुस्लिमबहुल वॉर्डांवर बसपचे लक्ष राहणार आहे. यंदा वॉर्डरचना आणि आरक्षणावर बसप चांगलाच नाराज आहे. जे दलितबहुल वॉर्ड आहे ते सर्वसाधारण झाले तर दलितबहुल वॉर्डात इतर आरक्षण पडले. याचा फटकासुद्धा बसल्याचे बसपचे म्हणणे आहे. 

प्रदेशाध्यक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपला मतदारांनी अव्हेरले. त्यामुळे पक्षाने राज्याच्या नेतृत्वात बदल करून नव्या दमाचे नेते अॅड. संदीप ताजणे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अॅड. ताजणे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. शिवाय अॅड. ताजणे यांचे महाविद्यालयीन शिक्षणही औरंगाबादमध्ये झाले असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून, निवडणूक काळात त्यांच्यासह पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी शहरात तळ ठोकणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

यावेळी महापालिकेत आम्ही निश्चितच दुहेरी आकडा गाठू. आंबेडकरी समाज हा बसपचा मतदार आहे. बुद्धिजीवी, फुले-शाहू-आंबेडकर-कांशीरामजी यांची विचारधारा मानणारे आजही राष्ट्रीय पातळीवर बहन मायावतीजींना नेता मानतात. त्यामुळे महापालिकेत आमचे संख्याबळ वाढणार आहे. 
-  संदीप ताजणे, प्रदेशाध्यक्ष, बसप. 

जिथे शक्ती आहे अशा ३५ जागांवर आमचे अधिक लक्ष आहे. आम्ही महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरणार असून, कुणासोबत आघाडी करणार नाहीत. यावेळी जास्तीत-जास्त जागा आम्ही ताकदीने लढणार आहोत. 
- किशोर म्हस्के (माजी प्रदेश सचिव, बसप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Election BSP News