एमआयएम लढणार 75 जागांवर, मुस्लिम-दलित बहुल वाॅर्डावर लक्ष

एमआयएम लढणार 75 जागांवर, मुस्लिम-दलित बहुल वाॅर्डावर लक्ष

औरंगाबाद : मागील महापालिका निवडणुकीत तब्बल 26 जागा जिंकून ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने धमाकेदार एन्ट्री केली होती. पाच वर्षे प्रमुख विरोधीपक्ष राहिलेल्या एमआयएमने आता महापालिका निवडणुकीसाठी 115 पैकी 75 वॉर्डांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे सर्व वॉर्ड मुस्लिम-दलित-ओबीसीबहुल आहेत. एमआयएममध्ये सध्या इच्छुकांची संख्या प्रचंड असून कुणाला तिकीट द्यावे यासाठी पक्षाच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

वॉर्ड आरक्षण झाल्यानंतर एमआयएममधील इच्छुक कामाला लागले आहेत. मात्र, वॉर्ड आरक्षणात विद्यमान अनेक नगरसेवकांचा "पतंग' कापला गेला आहे. मुस्लिमबहुल असलेलेले नेहरुनगर, किराडपुरा, संजयनगर, कोतवालपुरा-गरम पाणी, कैसर कॉलनी हे वॉर्ड सर्वसाधारण झाले आहेत. यामध्ये कैसर कॉलनी सोडली तर इतर ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक आहेत. येथे आता तिकिटासाठी उड्या पडणार आहेत.

2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने जबरदस्त कामगिरी करीत 26 जागा जिंकल्या. यापैकी बहुतांश जागा मुस्लिमबहुल होत्या. सोबत सहा जागा या दलित समाजातील विजयी झाल्या. महापालिकेत एमआयएमने सर्वांना संधी मिळावी यासाठी विरोधी पक्ष आणि वॉर्ड समिती सभापती पदे दिली होती. तरीही पक्षात काही नगरसेवक नाराज होते त्यांच्या नाराजीचा फटका सुद्धा पक्षला बसला होता.

आता एमआयएमच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने औरंगाबाद मध्य व पूर्वमधून आघाडी मिळविली होती. तर विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्यमधून नासेर सिद्दीकी यांना 68 हजार 325 मते मिळाली तर पूर्वमधून डॉ. गफ्फार कादरी यांनी 80 हजार 36 मते मिळविली होती. त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघातील वॉर्डावरच एमआयएमची मदार आहे.

हेही वाचा : जनतेवर विश्‍वास नसेल तर बूट हातात घ्यावे लागतात - रोहित पवार 

वंचितसाठी एक गट आग्रही 

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील यांना लोकसभेत जाता आले. मात्र, विधानसभेत जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये मिठाचा खडा पडला. महापालिका निवडणुकीत वंचितला सोबत घ्यावे यासाठी एमआयएमचा एक गट आग्रही आहे. विधानसभा निवडणुकीत मध्यमधून वंचित बहुजन आघाडीच्या अमित भुईगळ यांना 27 हजार 302 तर औरंगाबाद पश्‍चिम मधून संदीप शिरसाट यांना 25 हजार 649 मते मिळाली होती.

क्लिक करा : कंदिलाने काळवंडलेल्या घरात प्रकाश 

जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देणार 

आम्ही जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देणार आहोत. सध्यातरी आम्ही 75 जागांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. आता वंचितला सोबत घ्यावे किंवा नाही या बाबत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना विचारावे लागणार आहे. असे डॉ. गफ्फार कादरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com