बाप रे..! औरंगाबाद महापालिकेला तब्बल एवढ्या कोटींचा फटका, आकडा वाचून तुम्ही होणार थक्कच

Aurangabad mahapalika.jpg
Aurangabad mahapalika.jpg

औरंगाबाद : आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. मालमत्ताकर, पाणीपट्टीची वसुली ठप्प झाली असून, नगररचना विभागातही फायलींची संख्या रोडावली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत सुमारे १०० कोटी रुपयांची उत्पन्नात तूट झाल्याचे समोर आले आहे. 

महापालिकेची आर्थिक घडी काही वर्षांपासून बिघडली आहे. अत्यल्प उत्पन्न व अफाट खर्च यामुळे कोट्यवधी रुपयांची देणी शिल्लक आहेत. वसुली वाढवून कंत्राटदारांची देणी देण्याची प्रशासनाने तयारी केली होती. मात्र मार्च महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला व त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केले. या लॉकडाउनमुळे सर्वसामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त झाले. पोट भरण्यासाठीच संघर्ष सुरू असताना महापालिकेचा कर कुठून भरायचा, असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला.

त्यामुळे पाच महिन्यांपासून महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. प्रशासनाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार न करता जुलैपर्यंतच्या खर्चाची तरतूद लेखा अनुदान सादर करून केली होती. त्यात मालमत्ता करापोटी ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र, तिजोरीत १४ कोटी रुपयेच जमा झाले. पाणीपट्टीपोटी २४ कोटी रुपये जमा होणे अपेक्षित होते पण फक्त चार कोटी रुपयेच जमा आले. नगररचना विभागाकडून मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे १०० कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते; पण फक्त दोन कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे पाच महिन्यांत सुमारे १०० कोटी रुपयांचा फटका महापालिकेला बसला आहे. 

फक्त कोरोनावरच लक्ष 
गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांसाठी कामाला लागली आहे. त्यामुळे वसुलीच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता वसुलीकडे प्रशासक आस्‍तिककुमार पांडेय यांनी लक्ष केंद्रित केले आहे. एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून, लवकरच वसुली मोहीम सुरू केली जाणार आहे. 

लॉकडाउनमुळे तब्बल अडीच ते तीन महिने संचारबंदी होती. मात्र काही व्यावसायिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे कराचा भरणा केला. असे असले तरी महापालिकेच्या उत्पन्नात मोठी तूट आली आहे. 
- संजय पवार, मुख्य लेखाधिकारी. 

Edit- Pratap Awachar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com