औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अशी होणार वाॅर्ड रचना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

महापालिकेची एप्रिल 2020 मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले होते. त्यानुसार महापालिकेने तयार केलेला प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी आयोगाकडे पाठविला होता. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले व नव्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धतीने नव्हे, तर वॉर्डरचनेनुसारच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद- महापालिकेच्या एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आता वॉर्डरचना तयार केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. तीन) यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश दिले असून, अवघ्या पाच दिवसांत म्हणजेच आठ जानेवारीपर्यंत महापालिकेला वॉर्डरचना तयार करून अहवाल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या समितीपुढे सादर करावा लागणार आहे.

तसेच विभागीय आयुक्त हा प्रस्ताव 13 जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाला पाठवतील. आयोगाच्या मंजुरीनंतर आरक्षण सोडत व हरकती, आक्षेपांवर सुनावणी होईल.  महापालिकेची एप्रिल 2020 मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले होते. त्यानुसार महापालिकेने तयार केलेला प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी आयोगाकडे पाठविला होता.

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले व नव्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धतीने नव्हे, तर वॉर्डरचनेनुसारच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभागरचनेच्या आरक्षण सोडतीला स्थगिती दिली. मात्र, एकसदस्यीय वॉर्डपद्धतीने नवीन रचना करण्याबाबतची सूचना प्राप्त झाली नव्हती. अखेर तीन जानेवारीला महापालिका प्रशासनाला आयोगाचे पत्र प्राप्त झाले. निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आयुक्तांना हे पत्र पाठविले आहे. यात नमूद आहे, की यापूर्वीची बहुसदस्यीय प्रभागरचना रद्द करण्यात येत आहेत.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक सिंगल वॉर्डपद्धतीने घेतली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने एकसदस्यीय प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त समितीसमोर आठ जानेवारीपर्यंत सादर करावा. समितीने 13 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे हा प्रस्ताव सादर करावा. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

वॉर्डांच्या बदलणार सीमा 
गेल्यावेळी महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा 113 वॉर्ड होते. त्यावेळी वॉर्डांची लोकसंख्या सरासरी 10 हजार एवढी होती. त्यानंतर सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट झाला. या भागाची लोकसंख्या 50 हजारांहून अधिक होती. मात्र, महापालिकेने 115 वॉर्डांचे बंधन असल्याने फक्त दोनच वॉर्ड तयार केले. आता संपूर्ण रचना नव्याने होणार आहे. मात्र, वॉर्डांची संख्या जरी 115 इतकीच राहणार आहे. त्यामुळे सातारा-देवळाई वॉर्डाची लोकसंख्या कमी करताना या भागात पाच वॉर्ड होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अनेक वॉर्डाच्या सीमा बदलण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Election