एक हजार पानांचा वॉर्ड रचनेत दडलय काय... वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

महापालिकेने वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासह विद्यमान आरक्षण आणि यापूर्वीचे आरक्षण याची एकत्रित माहिती समितीला दिली आहे. त्यानुसार समितीकडून आपल्या स्तरावर आरक्षण कसे असावे, अशी टिप्पणी देण्यात आली आहे. त्यावर शिक्कामोर्तब मात्र आयोगाकडून करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद, ता. 13 ः महापालिकेच्या एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने वॉर्ड रचनेचा सुमारे एक हजार पानाचा प्रस्ताव सोमवारी (ता. 13) सादर केला आहे. पुढील एक-दोन दिवसांत आरक्षण सोडतीसंदर्भात आयोगाकडून आदेश येण्याची शक्‍यता आहे. 

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

महापालिकेची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी राज्यात महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेतल्या जात होत्या. त्यानुसार आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने तसा प्रस्ताव सादर केला; मात्र नव्या सरकारने वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयोगाने एक सदस्य प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले.

नव्या आदेशानुसार एक सदस्यीय प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करून महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे सादर केले. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या त्रिसदस्यीय समितीने 115 वॉर्डांची प्रारूप रचना अंतिम करून सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली. 
 
सातारा-देवळाईत पाच वॉर्ड 
नव्या वॉर्ड रचनेमध्ये जुन्या वॉर्डाच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत. सातारा-देवळाईत लोकसंख्येच्या प्रमाणात पाच वॉर्ड नव्याने तयार केले गेले. त्यामुळे शहरातील तीन वॉर्डांच्या सीमा बदलल्या जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे 115 वॉर्डाचा एक हजार पानांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 
 
जुन्या आरक्षणाची दिली माहिती 
महापालिकेने वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासह विद्यमान आरक्षण आणि यापूर्वीचे आरक्षण याची एकत्रित माहिती समितीला दिली आहे. त्यानुसार समितीकडून आपल्या स्तरावर आरक्षण कसे असावे, अशी टिप्पणी देण्यात आली आहे. त्यावर शिक्कामोर्तब मात्र आयोगाकडून करण्यात येणार आहे. 
 
आरक्षणाची उत्सूकता 
विद्यामान नगरसेवक व इच्छूकांना प्रतीक्षा आहे ती आरक्षणाची. कोणत्या वॉर्डाला कोणते आरक्षण असेल? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2015 मध्ये खुल्या प्रवर्गात असलेले बहुतांश वॉर्ड यंदा आरक्षणात जाण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. 115 पैकी 22 वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येतील. दोन वॉर्ड एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतील तर 50 टक्के महिला आरक्षणही राहणार आहे. 
 
दिग्गजांकडून पर्यायांचा शोध सुरू 
चक्राकार पद्धतीने आरक्षण निघणार असल्यामुळे महापालिकेतील दिग्गज संकटात सापडले आहेत. त्यांना आपले हक्काचे वॉर्ड गमवावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यायी वॉर्डांचा शोध अनेकांनी सुरू केला आहे.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Election News