मुख्यमंत्री, आमदार कचरा प्रक्रियेवर नाराज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शहरातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. हर्सूल येथील प्रकल्पाची निविदा तातडीने मंजूर करण्याचे आदेश यावेळी श्री. ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद- घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे; मात्र महापालिकेला चारपैकी केवळ एकच प्रकल्प कार्यान्वित करण्यात यश आले आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. नऊ) विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शहरातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. हर्सूल येथील प्रकल्पाची निविदा तातडीने मंजूर करण्याचे आदेश यावेळी श्री. ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

कचराकोंडीनंतर राज्य शासनाने हस्तक्षेप करीत महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. गेल्या दीड वर्षात महापालिकेला केवळ एकाच प्रकल्पाचे काम पूर्ण करता आले. हर्सूल येथील प्रकल्पाची निविदा अंतिम होऊ शकली नाही. पडेगाव, कांचनवाडी येथील प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी हर्सूल येथील निविदा का रखडली याबाबत विचारणा केली असता, स्थायी समितीने जुन्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत जुनीच निविदा तातडीने मंजूर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. दरम्यान, संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कामे प्रगतिपथावर असल्याचा खुलासा केला. 
 
तीन महिन्यांत पूर्ण होणार कामे 
दरम्यान, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी कचराप्रक्रिया प्रकल्पांची कामे तीन महिन्यांत पूर्ण केली जातील, असे आश्‍वासन यावेळी दिले. 
 
सर्व प्रस्ताव एकत्र द्या 
महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या मागणीचे प्रस्ताव दिले. त्यावर महापालिकेला निधी मिळाला पाहिजे, असे मत व्यक्त करीत सर्वच प्रस्तावाचा विचार केला जाईल, असे आश्‍वासन महापौरांना दिले. 

गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News