एमआयएम पक्षाचे ते कार्यकर्ते का म्हणाले, माझे नाव सांगू नका...

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद-दिल्ली गेटसमोरील रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या फर्निचर व्यापाऱ्यांवर महापालिकेने शेकडो वेळा कारवाई केली; मात्र महापालिकेचे पथक माघारी फिरताच याठिकाणी पुन्हा दुकाने थाटली जातात. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने बुधवारी (ता. 12) पुन्हा एकदा अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.

रस्त्याला लागूनच झाडे लावल्याने अपघात होतील, असा पवित्रा घेत एमआयएम नगरसेवकांनी आयुक्तांच्या मोहिमेला विरोध केला. लावलेली रोपे कार्यकर्त्यांनी उपटून फेकली. त्यामुळे संतप्त आयुक्तांनी पोलिस बंदोबस्त घेऊन पुन्हा वृक्षारोपण केले. विरोध करणाऱ्यांचे व्हीडीओ फुटेज सादर करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. दिल्लीगेट समोर रस्त्याशेजारी फर्निचर विक्री व बेकायदा वाहन पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महापालिकेने आतापर्यंत शेकडोवेळा कारवाया केल्या आहेत. मात्र येथील प्रश्‍न कायम आहे.

आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी याठिकाणी भेट देऊन कारवाई केली होती. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती असल्याने आयुक्तांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम यांना बुधवारी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. अतिक्रमण हटाव पथकाने दुपारी फर्निचर विक्रेते व वाहनांवर कारवाई केली. यावेळी जमावाने विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवर वृक्षारोपण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानुसार विभागाचे विजय पाटील व कर्मचारी जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदण्यास सुरवात करताच एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी, फेरोज खान, अब्दुल अजीम, अब्दुल रऊफ, शेख अहमद, विरोधी पक्षनेत्यांचे पती अरुण बोर्डे यांनी विरोध केला; मात्र अधिकारी ऐकत नसल्याने या नगरसेवकांनी महापौरांचे दालन गाठले व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांना गळ घातली. महापौरांनी आयुक्तांशी मोबाईलवरून संपर्क साधत कारवाई थांबविण्यास सांगितले.

आयुक्तांनी नकार दिला. त्यावर नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे काम केले जाणार आहे. रस्त्यालगत तारेचे कुंपण घातले तर अपघात होतील, असा पवित्रा घेतला. महापौरांनी रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर झाडे काढण्याची भूमिका आयुक्तांची आहे, अशी समजूत काढली. त्यानंतरही एमआयएम नगरसेवक महापौरांना दिल्लीगेटवर घेऊन गेले. याठिकाणी महापौरांनी पाहणी केली. त्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी लावलेली काही झाडे उपटून फेकली. याची माहिती मिळताच आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पथकाला जागेवरून न हलण्याची सूचना केली. काही वेळातच पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त पाहताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. पोलिस बंदोबस्तात त्या जागेवर पुन्हा झाडे लावण्याचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत झाडे लावण्याचे काम सुरू होते. आयुक्तांनी अशीच कारवाई, आमखास मैदानालगत व सिडको भागात केली आहे. 
 
माझे नाव सांगू नका... 
आयुक्त संतप्त होताच एमआयएमच्या अनेकांनी घटनास्थळ सोडले. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना फोन करून "आमचे नाव, आयुक्तांकडे पाठवू नका' अशा विनंत्या फोनवरून केल्या जात होत्या. विरोध करणाऱ्यांविरोधात आयुक्त काय भूमिका घेतात, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com