Coronavirus : कोरोना रुग्णासोबत रोज घालवतात आठ तास, वाचा नर्सिंग ऑफिसरचा अनुभव

मनोज साखरे
Monday, 13 April 2020

आम्ही आमचे जीव धोक्यात घालुन लढत आहोत, याची आम्हाला भीती नाहीये..पण कुटुंबाची काळजी वाटते एवढेच. तरीही आम्ही कोरोनाशी दोन हात करीत आहोत करीत राहणार, लढत राहणारच..अशी धीरोदात्त भावना घाटी रुग्णालयात कोरोनाविरुद्ध लढा देणारे नर्सिंग ऑफिसर स्तवन इंगळे यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद- ‘‘सद्यःस्थिती खूपच गंभीर आहे. तुम्हीही गंभीर व्हा! तुम्हाला फक्त घरात बसायचे. आम्हाला कोरोनाचे रुग्ण हाताळावे लागतात. आठ तास त्यांच्या सान्निध्यात राहावे लागते. त्यांची सेवा करावी लागते. आम्ही आमचे जीव धोक्यात घालून लढत आहोत, याची आम्हाला भीती नाही; पण कुटुंबीयांची काळजी वाटते. तरीही आम्ही कोरोनाशी दोन हात करीत आहोत. करीत राहणार,’’ अशी धीरोदात्त भावना घाटी रुग्णालयात कोरोनाविरुद्ध लढा देणारे नर्सिंग ऑफिसर स्तवन इंगळे यांनी व्यक्त केली. त्यांची पत्नीही परिचारिका असून, दोघेही रुग्णसेवा करीत आहेत.

श्री. इंगळे म्हणाले, ‘‘मी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी) येथे नऊ वर्षांपासून काम करतोय. नर्सिंग ऑफिसर आहे. टीबी स्वाइन फ्लू, हवेतून पसरणारे व इतर संसर्गजन्य आजारांचा अनुभव आता कामी येत आहे. अनुभव असल्याने मला माझ्या जिवाची भीती नाही; पण कुटुंबाची काळजी आहे. त्यांची चिंता आहे.

माझ्यामुळे त्यांच्यात आजार पसरू नये. कुटुंबात कुणालाही लागण होऊ नये, ही भीती मनात सतत सतावतेय. कोरोना वॉर्डात आम्ही नित्य आठ तास काम करतो. रुग्ण आल्यानंतर त्याला हाताळावे लागते. त्याच्या त्रासाबद्दल डॉक्टर सांगतात त्यानुसार सेवा करतो. त्यामुळे आम्ही रणांगणात शत्रूच्या अगदी समोर दोन हात करून लढत आहोत. म्हणूनच आई-वडिलांना गावी पाठविले. माझी पत्नीही परिचारिका आहे. ती आपली सेवी ऑपरेशन थिएटरमध्ये बजाविते.

Image may contain: 1 person, close-up
स्तवन इंगळे

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मी कोरोनाशी लढत असल्याने ड्युटी संपल्यानंतर घरी जातो, तेव्हा पत्नी वेगळ्या खोलीत राहते. रुग्णालयात असताना वापरलेले कपडेही धुण्यासाठी मी गरम पाण्यामध्ये स्वतः ठेवतो. स्नान करून स्वतःला सॅनेटाईज्ड केल्यानंतरच घरात पत्नीशी संभाषण करतो. ती परिचारिका आहे. त्यामुळे कोरोनाबाबत तीही समंजस असल्याने या गोष्टीचा खूप आधार मिळतो.

आम्ही उपलब्ध पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) किट अत्यंत काळजीने वापरत आहोत. देशात पीपीई किटची सध्या उपलब्धता कमी आहे. म्हणूनच काम करताना पीपीई किट तातडीने मिळेलच असेही नाही. त्यामुळेच आम्ही ती किट वेस्ट होणार नाही, याची दक्षता घेतो. जे उपलब्ध आहे ते काळजीने वापरतो.

याद्वारे आम्ही शासनाला सहकार्य करीत आहोत. आम्हाला आता जास्तीत जास्त शस्त्रांची गरज आहे. आधीची शस्त्र बोथट झाली. शस्त्र दिली अर्थातच पीपीई किट दिली तर आम्ही कोरोनाचा लढा आणखी हिमतीने लढू शकतो.’’

घराबाहेर पडू नका!
नागरिकांना घरी बसण्याचे सांगितले जात आहे. अर्थातच आम्ही तुमच्या आरोग्याची आणि जिवाची काळजी करीत आहोत. परिस्थिती सहज आणि साधी समजू नका. तुम्ही गंभीर व्हा! कृपा करून घराबाहेर पडू नका. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात राहील. परिणामी, आमचा आणि शासनाचा कोरोनाविरुद्धचा लढा अधिक सोपा जाईल. रुग्ण वाढतील आणि शिपाई कमी होतील आणि परिस्थिती आपल्या हातून जाईल असं करू नका, असे आवाहनही श्री. इंगळे यांनी केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Nursing Officers Experience Directly From The Coronado Ward