आई पुढे जाताच मागून येणाऱ्या चिमुकल्याला ट्रकने उडविले अन...

मनोज साखरे
Tuesday, 28 January 2020

ज्यावेळी चांदणी पागोरे मोठा मुलगा संविधान याला घेण्यासाठी रस्ता ओलांडायला निघाल्या, त्यानंतर आजोबांच्या कुशीत असलेला संघर्ष आईच्या मागे लागला. तो आईसोबत गेला; पण हायवाच्या धडकेने तो कुटुंबाला सोडून कायमचाच निघून गेला. 

औरंगाबाद - आई रस्त्यावरून पुढे जाताना मागे येणाऱ्या तीनवर्षीय मुलाला हायवाची धडक बसली. यात तो जागीच ठार झाला. आई जखमी झाली. हा अपघात सोमवारी (ता. 27) नक्षत्रवाडी भागातील पैठण रस्त्यावर घडला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संघर्ष लक्ष्मण पागोरे (वय तीन) असे मृताचे नाव आहे; तर चांदणी लक्ष्मण पागोरे (वय 28, रा. नक्षत्रवाडी) असे जखमी आईचे नाव आहे. नवीन बायपासचे काम पैठण रोड व नक्षत्रवाडी भागात सुरू आहे.

त्यामुळे या भागात रस्त्याच्या कामासाठी हायवा व इतर ट्रकची सतत मोठी वाहतूक आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, मोठ्या मुलाला शाळेतून घेण्यासाठी चांदणी या पैठण रस्त्यावर गेल्या. त्यावेळी त्यांच्यामागे त्यांचा छोटा मुलगा संघर्ष येत होता.

रस्ता पार करताना हायवाची (एमएच 20, बीटी 4763) धडक संघर्ष व चांदणी पागोरे यांना बसली. अपघातात चांदणी पागोरे जखमी झाल्या; परंतु संघर्षचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेचच संघर्ष व त्याच्या आईला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चांदणी पागोरे यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. घटनेनंतर पोलिस उपनिरीक्षक एस. ए. शिरसाठ व त्यांचे पथक घटनास्थळी गेले. त्यांनी पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी हायवा ताब्यात घेतला. 

गुन्हा दाखल 
घटनेनंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी हायवाचालक सय्यद ख्वाजा सय्यद नबी हसन याला मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडविले. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी नीतेश पागोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

...अन्‌ तो आजोबांच्या कुशीतून कायमचाच गेला 
ज्यावेळी चांदणी पागोरे मोठा मुलगा संविधान याला घेण्यासाठी रस्ता ओलांडायला निघाल्या, त्यानंतर आजोबांच्या कुशीत असलेला संघर्ष आईच्या मागे लागला. तो आईसोबत गेला; पण हायवाच्या धडकेने तो कुटुंबाला सोडून कायमचाच निघून गेला. 

वडिलांवर आभाळ कोसळले 
संघर्षचे वडील ऍड. लक्ष्मण दशरथ पागोरे हे पैठण येथे सरकारी वकील आहेत. सोमवारी अपघाताची माहिती समजताच ते तातडीने घाटी रुग्णालयात आले. त्यांनी जखमी पत्नीला पाहिल्यानंतर मुलाच्या मृत्यूची वार्ता त्यांना कळाली तेव्हा त्यांच्यावर दुःखाचे आभाळच कोसळले. मुलाच्या मृत्यूच्या वेदना त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त झाल्या. 

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Road Accident Chield Deth Mother Injured