मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होती, चर्रकन चिरला तिचा गळा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

शाळेतून मुलाला आणण्यासाठी निशा काळे यांना जावे लागले. शाळेतून त्या त्यांच्या मुलाला घरी घेऊन जात होत्या. त्यावेळी सुंदरवाडीत त्यांच्या गळ्यावर मांजा घासला गेला. गळ्याला गंभीर जखम झाल्यानंतर त्यांना चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

औरंगाबाद : एकीकडे चायनीज व नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिस विभाग छापे टाकीत असतानाच सुंदरवाडीत एका महिलेचा मांजामुळे गळा कापला गेल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल करण्यात आले आहे.

निशा निलेश काळे (वय 27, रा. सुंदरवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांची मुलगी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिथे त्यांचे पती मुलीची काळजी घेत आहेत. ते तिकडे गुंतून असल्याने शाळेतून मुलाला आणण्यासाठी निशा काळे यांना जावे लागले.

शाळेतून त्या त्यांच्या मुलाला घरी घेऊन जात होत्या. त्यावेळी सुंदरवाडीत त्यांच्या गळ्यावर मांजा घासला गेला. गळ्याला गंभीर जखम झाल्यानंतर त्यांना चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्जन डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी गळ्याला टाके देत उपचार सुरु केले. यावेळी डॉ. जाधव, डॉ. सराफ उपस्थित होत्या.

अधिक उपचार व काळजी निरीक्षणासाठी निशा काळे यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. सुत्रांनी माहिती दिली की, निशा काळे यांच्या मोठ्या धमनी (आर्टरी) ला इजा झाली नाही. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. मांजामुळे मध्यम स्वरुपाचा रक्तस्त्राव झाला. त्यांना डॉक्‍टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.  

हेही वाचा : ..आणि असे झाले तरुंगात हळदी कुंकु 

जवानाचाही गळा चिरला

औरंगाबाद : दुचाकीस्वार लष्करी जवान चा पतंगाच्या मांजामुळे गळ्याला काप पडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास छावणी परिसरात घडली. मांजामुळे श्वसननलिकेपर्यंत गळा चिरला गेला. लालचंद घुसिंगे (वय 36) असे जखमीचे नाव असुन त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गळ्याला टाके द्यावे लागले. अशा घटनेनंतर श्वसननलिकेला सूज येऊन प्रकृती गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे श्वाच्छोश्वासासाठी मानेजवळ छिद्र करून श्वाच्छोश्वास सुरळीत ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर ट्रामाकेअरमध्ये उपचार सुरु असुन प्रकृती स्थिर असल्याचे घाटीतील डॉक्‍टरांनी सांगितले. 

हेही वाचा : फेक इमेलद्वारे बसू शकतो आर्थिक फटका 

औरंगाबादेत नायलॉन मांजा विक्रेत्यावर पून्हा छापे 

औरंगाबाद : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री प्रकरणी दोन दुकानांवर बुधवारी (ता. 15) सिटीचौक पोलिसांनी छापे घातले. दुकानातुन साडे नऊ हजार रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार तेजसिंग संजयसिंग राजपुत (रा. बुढीलेन) व गणेश कचरु बऱ्हाणपुरे (रा. बुढीलेन) अशी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या सुचनेनूसार उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, हवालदार अप्पासाहेब देशमुख, पोलिस नाईक संदीप तायडे, बाशीद पटेल, शिपाई देशराज मोरे, संतोष शंकपाळ, बालाजी तोटेवाड, माजीद पटेल, सुनिता दणके यांनी केली. 

हेही वाचा : ती पोलिस भरतीची तयारी करीत होती पण..
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Sankranti Manja Accident Woman Injured