पालकांनो! औरंगाबादेतील पाचवीचे वर्ग सोमवारपासून होणार सुरु, महापालिकेने दिली परवानगी

संदीप लांडगे
Friday, 5 February 2021

दररोज मोठी ताई व दादा नियमित शाळेत जात असल्याचे पाहून इयत्ता पाचवीच्या घरी राहून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळेचे वेध लागले होते.

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून तर चार जानेवारीपासून मनपा हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले होते. त्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्ह्यात पाचवी ते आठवी तर शहरात सहावी ते आठवीचे वर्ग सुरु झाले होते. मात्र, मनपा प्रशासनाने कोरोनाबाबत सावध भूमिका घेत पाचवीचा वर्ग बंदच राहाणार असल्याचे कळवले होते. आता सोमवारपासून (ता.आठ) पाचवीचा वर्ग सुरु करण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे.

दीर्घ सुट्टीनंतर शहरी भागासह ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्वीसारखीच वाढत असल्याचे दिसून येत आहे. दररोज मोठी ताई व दादा नियमित शाळेत जात असल्याचे पाहून इयत्ता पाचवीच्या घरी राहून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळेचे वेध लागले होते. त्यामुळे वारंवार पाचवीचे मुले पालकांकडे शाळा कधी सुरु होणार याबाबत विचारणा करत होते. अखेर मनपा प्रशासनाने कोरोनाचे नियमाचे पालन करण्याच्या अटींवर सोमवारपासून पाचवीचा वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर पाचवीच्या मुलांना आपल्या वर्गातील बालमित्रांना भेटावयास मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महापालिका हद्दीत एक हजार ६० शाळांमधील ७ हजार ६२३ शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करणे सुरु आहे. यामधून इयत्ता पाचवीच्या शिक्षकांना वगळण्यात आले आहे. मात्र, पाचवीचे वर्ग सूरू करण्यापूर्वी या शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आवश्यक ती समंती घ्यावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीचा पर्याय निवडलेला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरु असणार आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Schools Updates Fifth Standard Classes Reopen From Monday