औरंगाबादकरांनो सावधान ! दहा पथके तैनात, तरीही वाहनचोरी जोरात! 

दुचाकी.jpg
दुचाकी.jpg

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून शहरात वाहनचोरीचे सत्र सुरू असल्याने गुन्हे शाखेने दहा पथके तैनात केली आहेत. शहरातील पार्किंग आणि गॅरेज चालकांकडे दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांचे चेसीस क्रमांक मिळवून त्यांच्या खऱ्या क्रमांकाची माहिती दररोज गुन्हे शाखा पथके घेत आहेत. असे असतानाही शहरात वाहन चोरीचे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. एका आठवड्यात पंधरा दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. 

वाहन चोरीचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. वाहनचोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण आहे. गेल्यावर्षी सुमारे साडेआठशेपेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्या. त्या मानाने २५ टक्के सुद्धा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यात पुन्हा नव्याने दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे हर्सूल कारागृहातून सुमारे पावणेचारशे बंदींना सोडण्यात आले आहे. त्याचा फायदा चोरांना होत आहे; मात्र त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पॅरोल आणि जामिनावर सुटका झालेल्या बंदीवानांची माहिती गोळा करण्याच्या सूचना गुन्हे शाखा व १७ पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना देखील करण्यात आल्या आहेत. 

येथे होतात सर्वांत जास्त चोऱ्या 

गुन्हे शाखेने शहरातील गर्दीची ठिकाणे निवडली आहेत. त्यामध्ये गुलमंडी, सिग्मा हॉस्पिटलचा परिसर, जवाहर कॉलनी, टीव्ही सेंटर, सिडको बसस्थानक परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, निराला बाजार, न्यायालये आदी ठिकाणे आहेत. याठिकाणी गुन्हे शाखेची दहा पथके रात्रंदिवस गस्त घालत आहेत. या भागात आजवर सर्वांत जास्त चोऱ्या झाल्याचे पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले. 

एकाच आठवड्यात १५ वाहने लांबविली 
आठवडाभरात शहरातून पंधरा वाहने चोरीला गेली आहेत. दरम्यान, हातावर पोट भरणाऱ्या मजुरांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत. शेख मुजाहिद शेख मजहर (२३, रा. रहेमानिया कॉलनी) हे हमाल असून, त्यांची दुचाकी (एमएच-२०, एफबी-७१६६) जाधववाडी, भाजी मंडईतून चोरीला गेली. शेख नईमोद्दीन शेख नशीरोद्दीन (३२, रा. आसेफिया कॉलनी, टाऊन हॉल) यांची दुचाकी (एमएच-२०,सीएन-४७५३) जसवंतपुरा, बारी कॉलनीतून चोराने लांबवली. तर संदीप कुंडलिक लोखंडे (३१, रा. एन-चार, सिडको) हे किराणा दुकानात कामाला आहेत. त्यांची दुचाकी (एमएच-२१-,एडब्ल्यू-७६०७) ही मुकुंदवाडीतील कामगार चौकातील आयडीबीआय बँकेच्या एटीएमसमोरून चोरीला गेली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com