मराठा उमेदवारांच्या गुणांकनाचा अंगणवाडी भरतीप्रक्रियेत पेच 

file photo
file photo

औरंगाबाद -  महिला व बालविकास मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनिसांच्या भरतीसंदर्भात आदेश दिले आहेत. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. या भरतीप्रक्रियेत मराठा समाजातील उमेदवारांच्या गुणांकनाबाबत शासनादेश काढावे अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषदेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) पार पडली. किशोर पवार यांनी मुद्दा उपस्थित केला, की मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे, 

तथापि अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती व मदतनिसांच्या भरतीप्रक्रियेत या समाजातील उमेदवारांना गुणांकनानुसार कसे गुण दिले जाणार आहेत अशी विचारणा केली. केवळ पॉइंट दोन, तीन गुणांमुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते असे सांगत या भरती प्रक्रियेविषयी खुलासा करण्याची मागणी केली.

यावर महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले, १३ ऑगस्ट २०१४ च्या शासनादेशानुसार ओबीसी, एससी यांच्याबाबत निर्देश आहेत; मात्र दिव्यांग आणि नवीन प्रवर्गाबाबत कोणतेही निर्देश आलेले नाहीत. महिला व बालविकास आयुक्तांमार्फत सचिवांना कळवले आहे, शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले आहे; मात्र अद्याप काही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. 

यावर या भरती प्रक्रियेत मराठा समाजातील उमेदवारांच्या गुणांकनाबाबत शासनाने शासनादेश काढावे अशी मागणी करणारा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

करोडी ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यासाठीचा प्रशासकीय ठराव मंजूर करून करोडी व साजापूर अशा दोन ग्रामपंचायती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून कोणत्या योजनांसाठी किती निधी प्राप्त झाला, योजनांची अंमलबजावणी किती झाली याविषयीची माहिती येत्या १५ दिवसांत सदस्यांना देण्याचे निर्देश अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले. 

उपकरातून समान निधी द्या 

पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, कोल्हापुरी बंधार्‍यालगतचा भराव वाहून गेलेल्या दुरुस्तीच्या कामांना उपकरात प्राधान्य देण्यात यावे. यापूर्वी विषय समितीने उपकरातील मंजूर केलेल्या कामांना त्या नियोजनात दुरुस्ती करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यात अद्याप दुरुस्ती झालेली नाही. 

मार्चअखेर जवळ येत आहे. यासाठी त्या नियोजनात विषय समितीने दुरुस्त्या कराव्या व सर्व सदस्यांच्या सर्कलमध्ये समान निधीचे वाटप करावे अशी बांधकाम समितीला विनंती करण्याचा यावेळी ठराव घेण्यात आला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com