एका चिठ्ठीने उधळले सत्तारांचे बंड; औरंगाबाद झेडपीत महाविकास आघाडीची सत्ता 

मधुकर कांबळे/अतुल पाटील
Saturday, 4 January 2020

महाविकास आघाडीतील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या टोकाच्या कॉंग्रेस विरोधामुळे त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी खेळी केल्या. यामुळे निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले.

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शुक्रवारी (ता. 4) दुपारी अखेर पडदा पडला. राजीनामा दिलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बंड एका चिठ्ठीने उधळून लावले. 

बंडखोर विद्यमान अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष आणि अब्दुल सत्तार पुरस्कृत उमेदवार देवयानी डोगावकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान 30-30 मते पडली. यात चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडीत मीना शेळके यांनी बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी भाजपचे लहानू गायकवाड यांची बहुमताने निवड झाली. 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी "महाविकास आघाडीचा अध्यक्ष नको' अशी भूमिका घेत थेट बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. एवढेच नव्हे, तर शनिवारी सकाळपासून त्यांनी दिलेल्या राज्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा झाली. 

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची समजूतसुद्धा काढली; मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तार समर्थकांनी शिवसेनेच्या बंडखोर विद्यमान अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर यांच्या पारड्यात मते टाकली. शिवाय भाजपच्या सदस्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला. 

Image may contain: 3 people, close-up
एका चिठ्ठीने मत पालटणारा विद्यार्थी

दोन्हीकडील मतांची संख्या समसमान झाल्याने समर्थ मिटकर या चिमुकल्या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडी-कॉंग्रेसच्या मीना शेळके यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. या चिठ्ठीमुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंडखोरीला लगाम बसला आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. 

असे चालले राजकीय नाट्य 

महाविकास आघाडीतील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या टोकाच्या कॉंग्रेस विरोधामुळे त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी खेळी केल्या. यामुळे निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले. 

वाचा - सत्तारांच्या राजीनाम्यावर काय म्हणतात संजय राऊत

शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी राज्यमंत्री सत्तार समर्थक गटाला सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी करत उमेदवारी अर्ज भरला. यामुळे महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल, असे स्पष्ट दिसत असतानाही निवडणूक अटीतटीची बनली. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing and indoor
नवनिर्वाचित अध्यक्षा मीना शेळके आपल्या मुलांसह

श्रीमती डोणगावकर यांना सत्तार समर्थक गट आणि भाजप सदस्यांचा पाठिंबा मिळवून देत सत्तार यांनी कॉंग्रेसच्या मीना शेळके यांना अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या गटाच्या समजल्या जाणाऱ्या करमाड गटातील मीना शेळके यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी सत्तार यांनी आपल्या सहा समर्थक सदस्यांना महाविकास आघाडीविरोधात मतदान करण्याचे आदेश दिले. 

बंडखोर विद्यमान अध्यक्षांना भाजपची साथ 

भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी पूर्वी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; पण प्रत्यक्ष सभागृहात मतदानाच्या वेळी भाजपने माघार घेत आपल्या सर्व 23 सदस्यांची मते देवयानी डोणगावकर यांना दिली होती. 

सत्तार समर्थक सहा सदस्यांनी देखील हीच भूमिका घेतल्याने देवयानी डोणगावकर यांचे पारडे जड झाले होते. मात्र, एका चिठ्ठीने त्यांच्या पारड्यात अपयश घातले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad Election Abdul sattar Breking News