एवढ्या कोटीचे प्रकल्प रखडले कसे...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

सिटी बससाठी ई-तिकीट प्रणाली विकसित करण्याच्या कामालाही लॉकडाउनमुळे ब्रेक लागला होता. आता या कामांना गती दिली जात आहे, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे महापालिकेचा कारभार ठप्प आहे. त्यात स्मार्ट सिटीचे ३९० कोटींचे प्रकल्पही रखडले आहेत. आता लॉकडाउन शिथिल झाल्याने रखडलेल्या प्रकल्पांना पुढील तीन महिन्यांत गती देण्यात येईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

शहरातील विकासकामांसोबतच स्मार्ट सिटीची कामे ठप्प झाली आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाची बैठक देखील गेल्या काही महिन्यांत झालेली नाही. स्मार्ट सिटीची तब्बल ३९० कोटींची कामे प्रलंबित आहेत. काही महिन्यांपूर्वी एमएसआय (मास्टर सिटी इंटिग्रेड) प्रकल्पाच्या कामाची निविदा अंतिम झाली असून, १७८ कोटींचे हे काम केईसी कंपनीला दिले आहे. त्यात सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, जागोजागी वायफाय सुविधा उपलब्ध करून देणे, दोन कंट्रोल रूम उभारणे अशा कामांचा सामावेश आहे.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

कंपनीने पोलिस आयुक्तालय व महापालिकेच्या पदमपुरा येथील इमारतीत एक असे दोन कंट्रोल कमांड रूम उभारण्यात आले; मात्र सध्या लॉकडाउनमुळे काम बंद आहे. शहर ब थांब्यांची कामे देखील अर्धवट आहेत. बारा ऐतिहासिक दरवाजांचे जतन व संवर्धन करण्याची निविदा रखडली आहे. चाळीस कोटी रुपये खर्चून ई-शासनप्रणाली प्रकल्प राबविला जाणार आहे. मिटमिटा येथे सफारी पार्कची उभारणी केली जाणार आहे. त्याची निविदा आता लवकरच राबविली जाणार आहे.

सिटी बससाठी ई-तिकीट प्रणाली विकसित करण्याच्या कामालाही लॉकडाउनमुळे ब्रेक लागला होता. आता या कामांना गती दिली जात आहे, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले. स्मार्ट सिटीअंतर्गत शहराला आतापर्यंत २८३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. पुढील निधीसाठी बोर्डाचा पाठपुरावा सुरू आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

असे आहेत प्रकल्प 
प्रकल्पाचे नाव किंमत 
एमएसआय १७८ कोटी 
स्मार्ट बस निवारे ५ कोटी 
सफारी पार्क १६० कोटी 
ऐतिहासिक गेटचे संवर्धन ४ कोटी 
ई-शासन प्रणाली ४० कोटी 
ई-तिकीट प्रणाली ३ कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad's stalled projects