पूजेवर ११ हजार ठेवा, अन्यथा पंधरा दिवसात मुलगा मरेल !

दिपक जोशी
Thursday, 22 October 2020

लग्न जमविण्याचे आमिष, भानामतीचे नाटक करणाऱ्या तिघांना बदडले 

लिंबेजळगाव (औरंगाबाद) : लग्न जमविण्याचे आमिष तसेच भानामतीचे नाटक करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. यातील चौथा फरार झाला. हा प्रकार तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथे आज बुधवारी (ता.२१) घडला. चाणाक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि अलगद पोलिसांच्या ताब्यात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील तुर्काबाद खराडी गावात बुधवारी दुपारच्या वेळेत शेवगाव रोडवरील भेंडा कारखाना भागातील चारजण आले होते. त्यातील एकाने तुर्काबाद गावाच्या अंबेलोहळ रस्त्यावर असलेल्या एका स्थानिकाचे घर गाठले. त्या घरात असलेल्या महिलेशी संवाद साधत घरातच पूजाअर्चा, भानामती मांडली. त्यानंतर त्याने तुम्ही या पूजेवर ११ हजार रुपये ठेवा अन्यथा तुमचा मुलगा येत्या १५ दिवसात मरून जाईल, अशी भीती दाखविली. यामुळे ती महिला घाबरली. ती पैशासाठी गावातीलच अन्य नातेवाइकांच्या घरी गेली. त्याठिकाणी सर्व हकीगत सांगताच अनेकजण जमा झाले. चौकशीअंती समजले की, एकूण चारजण कारने (एमएच-२०, बीएन-०१७७) गावात आलेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांत आणखीनच संशय बळावला. गावकऱ्यांनी त्यातील तिघांना पकडून बेदम चोप दिला, तर त्यातील चौथा घटनाक्रम पाहून फरार झाला होता. नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. पोलिसपाटील रामहरी पाटेकर यांना सदरची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. नंतर त्या तिघांशी चर्चा करून पोलिस पाटील पाटेकर यांनी त्यांना वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी फरारीचा शोध घेऊन सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यापूर्वीही आले होते तुर्काबादेत 

याविषयी पोलिसपाटील पाटेकर म्हणाले की, यातील काहीजण यापूर्वीही तुर्काबादेत येऊन गेल्याची माहिती मिळाली. सदरील महिलेला एकुलता एक मुलगा असून त्याचे लग्न जमत नसल्याची माहिती महिलेने त्यांना दिली होती. यावर त्याचे लग्न आम्ही जुळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समजले. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या मुलाचे लग्न झाले आहे. आज बुधवारी उपरोक्त लोक पुन्हा त्या महिलेच्या घरी आले होते. त्यानंतर सदरचा प्रकार घडला. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhanamati perpetrators Three arrested shocking incident Limbejalgaon