अगोदर वाटल्या फुकट...आता दर झाले तिप्पट

शेखलाल शेख
गुरुवार, 26 मार्च 2020

शहरात पोल्ट्री उत्पादनाची आवकच थांबल्याने चिकनचे दर वाढले आहे. सध्या चिकन १२० रुपये तर जिवंत कोंबडी ही ८० रुपये किलोने विकली जात आहे. 

औरंगाबादः कोरोनाच्या धास्तीने पोल्ट्रीचालकांना कोंबड्या फुकट वाटाव्या लागल्या तर काहींनी जिवंत पुरल्या. कित्येक ठिकाणी तर दहा ते तीस रुपये किलो दराने विक्री कराव्या लागल्या. आता मागील महिनाभरात पोल्ट्रीचे उत्पादनच न झाल्याने त्यातच २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर औरंगाबाद शहरात चिकनेच दर १२० रुपये किलोवर गेले आहेत. दर वाढलेले असले तरी संचारबंदीमुळे ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. 

कोरोनामुळे पोल्ट्रीचालकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. आता त्यांच्याकडील जवळपास सर्वच कोंबड्या विक्री झाल्या; तसेच काही जणांनी फुकटात वाटप केल्या. मागील महिनाभरापासून तर दर खूप जास्त कोसळले. 

हेही वाचा - कोरोना पेक्षा सारीचा ताप भयंकर औरंगाबादेत आठ रुग्ण

दहा ते चाळीस रुपये किलो दराने चिकन विक्री झाल्यानंतर राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी जाहीर केली होती. यानंतर २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला. आता शहरात पोल्ट्री उत्पादनाची आवकच थांबल्याने चिकनचे दर वाढले आहे. सध्या चिकन १२० रुपये तर जिवंत कोंबडी ही ८० रुपये किलोने विकली जात आहे. 

माशांच्या किमतीत बदल नाही 

औरंगाबाद शहरात माशांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. कोरोनामुळे माशांच्या विक्रीवर काहीसा परिणाम झाला होता; मात्र दर बदलले नव्हते. आता ही लॉकडाऊन जाहीर झालेला असला तरी किमतीत बदल झाला नाही. सध्या मासे १६० ते ५०० रुपये किलो दराने मिळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken Rate in Aurangabad News