
कोरोनामुळे मार्चपासून औरंगाबाद शहरात बंद झालेली स्मार्ट बससेवा अनलॉकनंतर गुरूवारपासून (ता.पाच) पुन्हा धावणार आहे.
औरंगाबाद : कोरोनामुळे मार्चपासून शहरात बंद झालेली स्मार्ट बससेवा अनलॉकनंतर गुरूवारपासून (ता.पाच) पुन्हा धावणार आहे. पहाटे ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे. शहरी प्रवाशांसह ग्रामीण भागातील लोकांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिकेने सिटी बससेवा सुरू केली आहे. स्मार्ट बस नावाने सुरू केलेल्या सिटी बस सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र मध्यंतरी कोरोना महामारीमुळे मार्चपासून सिटी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता सिटी बस नव्या मार्गांसह गुरूवारपासून (ता.पाच) सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक फेरीनंतर बसेसची स्वच्छता केली जाणार असल्याचे स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात बसेस नऊ मार्गांवर धावणार
सिटी बसच्या नवीन मार्गात चार नव्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. हे मार्ग प्रवाशांना शहराच्या हद्दीबाहेरील भागापर्यंतही सेवा देणार आहेत. ही बससेवा सिडको ते रेल्वेस्थानकमार्गे टीव्ही सेंटर, औरंगपुरा-वाळूज-औरंगपुरामार्गे धावतील. पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर, सिडको ते जोगेश्वरी, चिकलठाणा ते रांजणगाव, सेंट्रल बसस्टँड ते फुलंब्री , सेंट्रल बसस्टँड ते बिडकीन, सेंट्रल बसस्टँड ते करमाड आणि सेंट्रल बसस्टँड ते वेरूळ मार्गावर धावतील. दुसऱ्या टप्प्यात २६ आणि तिसऱ्या टप्प्यात २८ बसेस सुरू करण्यात येणार आहे.
नरभक्षक बिबट्याची दहशत, आष्टी-पाथर्डी हद्दीवरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पहाटे ५ वाजेपासून प्रवाशांना सिटीबसद्वारे प्रवास करता येणार आहे. रात्री ११ वाजेपर्यंत ही बससेवा सुरु असणार आहे. नव्या मार्गांसोबतच प्रवाशांकरिता वाहन ट्रॅकिंग अॅप सुरू होणार आहे. मोबाईल अॅपद्वारे प्रवाशांना संपूर्ण वेळापत्रक, स्मार्ट सिटीबसचे स्थान आणि विशिष्ट थांब्यांवर बस येण्याचा वेळ कळू शकणार आहे. बससेवे दरम्यान ई-तिकिट प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट ट्रॅव्हल कार्ड ही प्रवाशांना देण्यात येणार आहे.
संपादन - गणेश पिटेकर