मोलमजुरीवर उदरनिर्वाह असलेल्यांना करावी मुख्यमंत्र्यांनी मदत ! 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 26 मार्च 2020

राज्यातील हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींच्या रोजीरोटीची. अनेक कुटुंबे अशी आहेत की ती मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. रोज काम केले तरच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. त्यामुळे अशा कुटुंबीयांसाठी घरात राहून तीन आठवडे काढणे अशक्य आहे. किराणा माल, भाजीपाला यांची दुकाने उघडी जरी ठेवली असली तरी या नागरिकांनी ते आणायचे तरी कसे?

औरंगाबाद : राज्यातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना शासनाने तातडीने एक महिन्याचे रेशन व इतर खर्चापोटी शक्य होईल ती आर्थिक मदत करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी (ता. २५) निवेदनाद्वारे केली. 

हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आणि आपले महाविकास आघाडी सरकार, शासकीय यंत्रणा अतिशय नियोजनपूर्वक व धोरणात्मक पावले उचलून महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण करीत आहात. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स’ हा एकमेव सुरक्षित उपाय असल्यानेच आपण तो तातडीने अमलात आणला. तो सध्या महत्त्वाचा उपाय आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..

त्याविषयी दुमत नाही; परंतु याप्रसंगी एका गोष्टीची काळजी वाटते. ते म्हणजे आपल्या राज्यातील हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींच्या रोजीरोटीची. अनेक कुटुंबे अशी आहेत की ती मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. रोज काम केले तरच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. त्यामुळे अशा कुटुंबीयांसाठी घरात राहून तीन आठवडे काढणे अशक्य आहे. किराणा माल, भाजीपाला यांची दुकाने उघडी जरी ठेवली असली तरी या नागरिकांनी ते आणायचे तरी कसे? त्यामुळे अशा नागरिकांचाही आपण विचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..  

राज्यात गरीब माणसे उपाशी राहता कामा नये, या न्यायाने सरकारने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरिबांना एक महिन्याचे रेशन व इतर खर्चापोटी आपणास शक्य होईल ती आर्थिक मदत त्यांना द्यावी. जेणेकरून या महामारीविरोधात लढत असताना आपले गोरगरीब बांधव घरात उपाशी राहणार नाहीत. तातडीने या उपाययोजना केल्या तर सर्वसामान्य लोकांच्या मनातील पोटाच्या भुकेच्या प्रश्नांसंबंधीची भीती दूर होऊन ते याकामी आपणास घरात राहून अधिक उपयुक्त मदत करतील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM should help those who are dependent on labor force