कोरोनाचा झटका : राज्यातील कोचिंग क्लासेसला तब्बल पाच हजार कोटींचा फटका 

संदीप लांडगे 
Wednesday, 21 October 2020

दहा लाखांवर सुशिक्षित बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठप्प 

औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यातील विविध प्रवेश परीक्षा, शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावीसाठीच्या मार्गदर्शन करणाऱ्या लहानमोठ्या एक लाखांपेक्षा जास्त कोचिंग क्लासेसची सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. या क्षेत्रातील खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यात सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांचा उदरनिर्वाह कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून चालतो. मागील सात महिन्यांपासून कोरोनामुळे अद्याप क्लासेस कुलूपबंद असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी राज्यात जवळपास अडीच ते तीन लाख विद्यार्थी जेईई, सीईटी, नीट या प्रवेश परीक्षा देतात. तीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावी, बारावीची परीक्षा तर हजारो मुले सनदी लेखापाल, कंपनी सचिव अशा अभ्यासक्रमाची तयारी क्लासेसच्या माध्यमातून करतात; परंतु कोचिंग क्लासेस बंद असल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. क्लासेस बंद असले तरी देशभरात कोरोनाच्या नियमांचे पालन करत स्पर्धा परीक्षा, प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे क्लासेस सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस असोसिएशनकडून केली जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यातील स्थिती 
एकट्या मराठवाड्यात दहा हजार कोचिंग क्लासेसमध्ये ५० हजार खासगी शिक्षक शिकवतात, तर औरंगाबादमध्ये तीन हजार क्लासेसच्या माध्यमातून २५ हजार शिक्षकांचा उदरनिर्वाह चालतो. कोचिंग क्लासेस हे क्षेत्र असंघटित असल्यामुळे शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. खासगी क्लासेस कोणत्या विभागाअंतर्गत येतात याची कुठलीही नोंद शासनाकडे नाही. केवळ शॉपॲक्ट लायसनवर हे क्लासेस चालतात. क्लासेसवर कोणाचे नियंत्रण असावे हे शासनाकडून स्पष्ट करावे. हॉस्टेल, मेस, स्टेशनरी व्यवसाय, बुक सेंटर हे सगळे कोचिंग क्लासेसवर व्यवसायावर अवलंबून आहेत. एसटी बस, हॉटेल्स, रेस्टारंट, बार सुरू झाले, मल्टिप्लेक्स चित्रपटगृहेही सुरू होणार आहेत. शहरांमध्ये सध्या प्रचंड गर्दीमध्ये सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. असे असताना खासगी वर्ग का बंद आहेत, असा प्रश्न या क्लासेसचालकाकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एक नोव्हेंबरपासून वर्ग सुरू करणार 

शासनाने कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा एक नोव्हेंबरपासून राज्यातील कोचिंग क्लासेस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीच्या अधीन राहून, पालकांचे हमीपत्र घेऊन एकाच दिवशी सुरू करण्यात येतील, असा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशन राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी पत्राद्वारे शासनाला कळवले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coaching classes five thousand crore loss due to corona in state