esakal | जिल्हाधिकारी पोहचले बांधावर सरपंच, पोलिस पाटील यांना केला दंड
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी पोहचले बांधावर सरपंच, पोलिस पाटील यांना केला दंड

गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे पीक कापणी प्रयोगास उपस्थित असलेले पोलीस पाटील लक्ष्मण तांबे, सरपंच अर्जुन घुसाळे, अप्पासाहेब घुसाळे, विस्तार अधिकारी प्रतिभा कांबळे यांच्यासह काही ग्रामस्थांनी मास्क न वापरल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी पाचशे रुपये दंड केला. 

जिल्हाधिकारी पोहचले बांधावर सरपंच, पोलिस पाटील यांना केला दंड

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबादः आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजिण्यात यावेत, यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत. दहेगाव बंगला येथे पीक कापनी प्रयोग पर्यवेक्षण, गंगापूर आणि वैजापूर येथील कोविड केअर केंद्रे, आरोग्य उपकेन्द्रे, उपजिल्हा रुग्णालय यांची पाहणी करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर तहसील कार्यालय, वैजापूर तालुक्यातील वैजापूर पंचायत समिती कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तसेच विना मास्क असलेल्या ग्रामस्थांना दंड आकारण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर.जा धव, प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, तहसीलदार अविनाश शिंगोटे याची उपस्थिती होती. 

शासकीय कार्यालयांत पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, वाफ घेण्यासाठी यंत्रे लावावीत. जागोजागी हात धुण्याची व्यवस्था करावी, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा. गाव, तालुका पातळीवरील बाजारांमध्ये अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, खाजगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स, सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी यांना विश्वासात घ्यावे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्यांना मास्कचे महत्त्व पटवून द्यावे.

हेही वाचा- बेकायदा मोबाईल टाॅवर उभारला तर मालकाला जबाबदार धरणार

मास्क हीच सध्याची लस आहे, हे जनतेला पटवून सांगावे. तालुका ठिकाणी व गाव पातळीवरील प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते व्यापाऱ्यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे. बहुतांश लोक बरे झाले आहेत, परंतु बरे होण्याचा दर अधिक चांगला असला तरी या आजाराबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथील शेतकरी आप्पासाहेब घुसाळे यांच्या शेतात पीक कापणी प्रयोगाचे प्रत्यक्ष पर्यवेक्षण करत मार्गदर्शन केले. यावेळी शेडनेटची पाहणी केली. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित विपणन व्यवस्था उभी करून यामध्ये युवक व बचत गटांची मदत घेणार आहे. 

पोलिस पाटील, सरपंच यांना दंड 

गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे पीक कापणी प्रयोगास उपस्थित असलेले पोलीस पाटील लक्ष्मण तांबे, सरपंच अर्जुन घुसाळे, अप्पासाहेब घुसाळे, विस्तार अधिकारी प्रतिभा कांबळे यांच्यासह काही ग्रामस्थांनी मास्क न वापरल्याने पाचशे रुपये दंड करत मास्कचे महत्व पटवून देत दिले.