esakal | औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिव पदी बदली 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिव पदी बदली 

चौधरी यांची उपसचिव मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय मुंबई येथील रिक्त पदावर बदली झाली आहे. विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवुन चौधरी यांनी नवीन पदभार त्वरीत स्वीकारावा असे आदेशात नमुद केले आहे. 

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिव पदी बदली 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः मागील काही दिवसांपासून औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बदलीची चर्चा होती. सोमवार (ता.१०) रोजी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहे. चौधरी यांची उपसचिव मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय मुंबई येथील रिक्त पदावर बदली झाली आहे. विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवुन चौधरी यांनी नवीन पदभार त्वरीत स्वीकारावा असे आदेशात नमुद केले आहे. 

१८ एप्रिल २०१८ रोजी उदय चौधरी यांची सिंधुदुर्ग येथून औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उदय चौधरी यांचा औरंगाबादेतील कार्यकाळ संमिश्र राहिला. कोरोनाच्या संकटात उदय चौधरी यांनी पोलीस, आरोग्य विभाग व महापालिकेच्या मदतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येत असतांनाच त्यांनी मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव पदी बदली करण्यात आली. 

एप्रिल २०१८ मध्ये जेव्हा शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता, तेव्हाच उदय चौधरी यांची सिंधुदुर्गहून औरंगाबादेत बदली करण्यात आली होती. त्यांचे बदली आदेश निघण्यापुर्वी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची १३ एप्रिलला औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. पण चारच दिवसांत त्यांची बदलली रद्द करून उदय चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. बीटेक (मॅकेनिकल) पदवी प्राप्त केलेल्या उदय चौधरी यांची अवघ्या २५व्या वर्षी आएएसपदी निवड झाली.

हेही वाचा- कुठे आहे कोरोनाचा वाढता धोका

२०१० बॅचचे आयएएस असलेले चौधरी जळगाव येथील मूळ रहिवासी आहेत. जुलै २०१६ ते एप्रिल २०१८ या कालावधीत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळला होता. यापूर्वी चौधरी यांनी गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काम केले होते. औरंगाबादेतील दोन वर्षाच्या काळात चौधरी यांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्यापंर्यत पोचवण्याचे काम केले. या शिवाय समृध्दी महामार्गासाठीचे भूसंपादन, शहरातील कचरकोंडीचा प्रश्न सोडवण्यात देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

गेल्यावर्षीच चौधरी यांच्या बदलीच्या चर्चा होत्या, परंतु लोकसभा-विधानसभा निवडणुकांमुळे त्यांची बदली टळली. त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने उदय चौधरी यांची बदली लांबणीवर पडली होती. उदय चौधरी यांची मंत्रालयात बदली झाल्यानंतर आता नवे जिल्हाधिकारी कोण याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे.