सुपरस्पेशालिटीचे विंगचे बांधकाम 97 टक्के पूर्ण? : एचएससीसीचा दावा

superspesiality wing gmch
superspesiality wing gmch

औरंगाबाद : घाटी रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचे बांधकाम पूर्णत्वास आले असून, 97 टक्केहून अधिक काम झाल्याचा दावा एचएससीसी कंपनीने केला आहे. दरम्यान, घाटी व एचएससीसीने या सुपरस्पेशालिटी ब्लॉकच्या भोगवटा प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे; मात्र अद्याप पाणी अन्‌ विजेची जोडणी मिळाली नसल्याने अतिविशेषोपचाराची प्रतीक्षा कायम आहे.

घाटी रुग्णालयात आठ अतिविशेषोपचार शाखांचे उपचार एका छताखाली आणण्यासाठी दीडशे कोटींची 248 खाटांची अत्याधुनिक सुविधा असलेली सुपरस्पेशालिटी विंग उभारण्यात येत आहे. डिसेंबर 2017 अखेर या विंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना आजही सुरू होऊ शकली नाही.

या विंगमध्ये तळमजल्यावर आपत्कालीन सेवा, डायलिसीस सेंटर, पहिला मजल्यावर न्यूरोसजर्री-न्यूरोलॉजी, कार्डियालॉजी-कार्डिओथोरॅसिक, नेफ्रोलॉजी-युरोलॉजी, बर्नकेअर-प्लॅस्टिक सर्जरी, नवजात शिशू विभाग या आठ शाखांचा बाह्यरुग्ण विभाग, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी तीन आयसीयू वॉर्ड, चौथ्या मजल्यावर 48 आयसीसीयू बेडची सुविधा, पाचव्या मजल्यावर सहा अत्याधुनिक शस्त्रक्रियागार, एक कॅथलॅब व डायग्नोस्टिक सेंटरची निर्मिती प्रस्तावित आहे. 

मनुष्यबळाची प्रतीक्षा 
या सेवा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 465, दुसऱ्या टप्प्यात 382 तर तिसऱ्या टप्प्यात 311 पदांचा असा एकूण 1,148 पदनिर्मितीचा प्रस्ताव जानेवारी 2018 पासून राज्याच्या हायपॉवर कमिटीकडे प्रलंबित असून, पाणी अन्‌ विजेच्या जोडणीअभावी दिवसेंदिवस हा प्रकल्प रेंगाळत असल्याने रुग्णांना अतिविशेषोपचाराची प्रतीक्षा कायम आहे. 

वीज पाण्याअभावी अडले इतर काम 
बांधकामाचे जवळपास 99 टक्के काम पूर्ण झाले. जे काही बाकी आहे ते केवळ वीज आणि पाणी कनेक्‍शनमुळे बाकी आहे. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्रासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे, अशी माहिती एचएससीसीचे श्री. भटनागर यांनी "सकाळ'ला दिली. विजेच्या सबस्टेशनचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

27 कोटींची यंत्रे दाखल 
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय) फेज-तीनमध्ये दीडशे कोटींची सुपरस्पेशालिटी विंग घाटी रुग्णालय परिसरात उभारण्यात येत आहे. त्यात राज्याचे 30 तर केंद्राचे 120 कोटींचे अनुदान आहे. त्यापैकी 86.73 कोटींचे बांधकाम तर 63.27 कोटींच्या यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

बांधकाम एचएससीसी तर यंत्रसामग्रीचे काम एचएलएलच्या मार्गदर्शनात सुरू आहे. एचएससीसीकडे 74.92 कोटींच्या बांधकामांपैकी 54 कोटींचा खर्च झाला आहे. एचएलएलला यंत्रसामग्रीसाठी आतापर्यंत 58 कोटी दिले आहेत. त्यापैकी 49.52 कोटींचा खर्च झाला असल्याचा कंपनीचा दावा असून, 27.27 कोटींची यंत्रसामग्री दाखल झालेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com