कोरोना.. हंड्रेड डेज.. वाचा औरंगाबादेतील सारं वास्तव

Sunday, 14 June 2020

कोरोनाच्या या शंभर दिवसांनी देशासह औरंगाबादकरांच्या जीवनात संकटावर संकटे आणली. कोरोनाचा प्रवास कधी थांबेल आणि आपण मोकळा श्वास कधी घेऊ माहीत नाही; पण तो दिवस नक्की उजाडणार आहे. आज तरी आपल्याला स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. 

औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीत औरंगाबादही होरपळून निघाले. ७ मार्चला शहरात पहिला रुग्ण आढळला. १५ जूनला त्याला शंभर दिवस पूर्ण होत आहेत. आतापर्यंत औरंगाबादेत रविवारी (ता. १४) सायंकाळी पाचपर्यंत २ हजार ७३९ रुग्ण बाधित झाले आहेत.

५ एप्रिलला शहरात कोरोनाने पहिला बळी घेतला. आजवर शहरात १४८ बळी गेले, ही गंभीर बाब आहे. या शंभर दिवसांनी देशासह औरंगाबादकरांच्या जीवनात संकटावर संकटे आणली. कोरोनाचा प्रवास कधी थांबेल आणि आपण मोकळा श्वास कधी घेऊ माहीत नाही; पण तो दिवस नक्की उजाडणार आहे. आज तरी आपल्याला स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. 

औरंगाबादकरांना पहिला धक्का (७ मार्च) 
सिडको एन- १ भागात प्रवास करून आलेल्या महिलेला कोविडचा संसर्ग झाल्याचे ७ मार्चला निष्पन्न झाले. ही बाब समजताच शहरवासीयांना मोठा धक्का बसला. कारण शहरात कोरोनाचा प्रवेश झाला होता. संसर्गजन्य आणि श्वसनयंत्रणेवर आघात करणारा विषाणू असल्याने मोठी काळजी वाढत गेली. 

बाधित रुग्णाला सुटी आणि सुटकेचा निःश्वास! (२२ मार्च) 
बाधित महिला रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची वार्ता समजताच नागरिकांना आनंद झाला. त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. महिलेचे कुटुंबही सुखावले; पण या काळात अनेक अफवाही पसरल्याने लोकांत जास्तच धास्ती बसली होती. 

आणखी दोनजणांना बाधा, डोकेदुखी वाढली (२ एप्रिल ) 
दोन एप्रिलला जलाल कॉलनी आणि सिडको एन- ४ येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली. या दोन्ही रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. प्रखर जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एन-४, सिडको येथील महिला कोरोनामुक्त झाली. 

एकाच दिवशी सात रुग्ण (पाच एप्रिल) 
५ एप्रिलला औरंगाबादेत एकाच दिवशी सात रुग्ण आढळले. यानंतर एक-दोन-तीन-चार असे रुग्ण आढळत गेले. हा काळ औरंगाबादकरांसाठी अत्यंत कठीण होता. याच काळात अत्यंत कडक लॉकडाउन औरंगाबादकरांनी अनुभवले. 

ताणतणाव वाढला, रोजीरोटी ठप्प 
कोरोनामुळे जीवनपद्धतीतच बदल झाले. संपर्क संचार स्वातंत्र्यावर गदा आली. लोकांना घरातच कोंडून घ्यावे लागले. अर्थात, लॉकडाउन होते. ताणतणाव वाढत गेला. ‘मला कोरोना होतो काय? इथपर्यंत लोक विचार करू लागले.’ या काळात लोकांची मानसिक स्थिती विचलित झाली. 

इथपर्यंत सर्व काही ठीक; पण नंतर (२६ एप्रिल) 
२६ एप्रिलपर्यंत रुग्णवाढीचा दर अत्यंत कमी होता. पहिल्या पन्नास दिवसांत ५३ रुग्ण बाधित होते. शहराच्या विशिष्ट भागामध्येच रुग्ण आढळत होते. त्यामुळे थोडा दिलासा होता; मात्र २७ एप्रिलपासून औरंगाबादकरांमध्ये मोठी चिंता वाढत गेली. 

काय झाले २७ एप्रिलनंतर? 
२७ एप्रिलची ती सकाळ. याच दिवशी तब्बल २९ जण कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि औरंगाबादकरांचे धाबे दणाणले. २७ एप्रिलनंतर मात्र रुग्णसंख्या सातत्याने वाढत गेली. विशेषतः औरंगाबादचा दुपटीचा रेटही या काळात पाच टक्के होता. हा रेट बराच काळ स्थिरावला. 

एकाच दिवशी १०० पॉझिटिव्ह (८ मे) 
सातारा येथील ७४ जवानांचे रिपोर्ट एका दिवशी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पुन्हा शहराला धक्का बसला तो दिवस आठ मे होता. याच दिवशी तेव्हापर्यंत सर्वोच्च एका दिवसात १०० रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. 

एकूण दीड हजार नागरिक पॉझिटिव्ह! (३१ मे ) 
औरंगाबादकरांनी सलग एक ते पाच लॉकडाउन अनुभवले. ३१ मेपर्यंत रुग्णसंख्या १,५४३ झाली होती; मात्र २० ते २७ मेदरम्यान रुग्णवाढीचा वेग मंदावला. ३१ मेनंतर औरंगाबादकरांनी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता अनुभवली. 

दुकाने उघडली, संसर्गही वाढला (१ ते पाच जून ) 
औरंगाबादमध्ये एक जूननंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. पाच जूनला दुकाने उघडली. सम-विषम पद्धतीचा अवलंब झाला. औरंगाबादकरांच्या मनात आणि बाजारातही चैतन्य निर्माण झाले. पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला. सिनेमागृह, शॉपिंग मॉल आणि आठवडे बाजार वगळता शहर अर्धेअधिक खुले झाले आणि रस्त्यावर लोकांची रेलचेल वाढली. 

तेरा दिवसांत १०८३ जण बाधित (१ ते १३ जून) 
बाजारात एकीकडे शहरात चैतन्य निर्माण झाले; मात्र दुसरीकडे दोन जूनला ६२ रुग्ण वाढले. त्यानंतर औरंगाबादेत रुग्णवाढीचा दर कमालीचा वाढला. सहा जूनला १०४, दहा जूनला १२५, अकरा जूनला १५५, बारा जूनला १०५ आणि तेरा जूनला ८७ रुग्ण आढळले. ही मात्र औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा आहे. १ जून ते १३ जूनदरम्यान १ हजार ८३ लोक बाधित झाले. 

मृत्यूने भरली धडकी...(५ एप्रिल) 
औरंगाबाद ५ एप्रिलला कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर १४, १८, २१, २२, २७, २८ एप्रिलच्या या तारखांना कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. अर्थात, एप्रिल महिन्यामध्ये एकूण सात मृत्यू कोरोना आणि इतर व्याधींनी झाले. 

मे महिन्यात मृत्यूचा वेढा 
एप्रिल महिन्यात सात मृत्यूने धडकी भरली असताना, मे महिना मात्र भीषण, भयावह होता. या महिन्यात तब्बल ७१ मृत्यू कोरोना आणि इतर व्याधींनी झाले. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात १० पट मृत्यू झाले. रुग्णवाढीचा दरही मोठ्या प्रमाणात वाढत होता. जळगाव, पुण्यानंतर देशात सर्वांत जास्त मृत्युदर औरंगाबादेत होता. 

जूनमध्ये मृत्युदर सर्वांत जास्त 
जूनमध्येही औरंगाबादकरांना दिलासा मिळाला नाही. एक ते तेरा जूनला सायंकाळी पाचपर्यंत ७० रुग्णांचे बळी गेले. एकूण बळींमध्ये ४७.२९ टक्के बळी केवळ जूनच्या १४ दिवसांत गेले आहेत. ही गंभीर बाब आहे. 

९० टक्के रुग्णांना इतर आजार 
निव्वळ कोरोनामुळे ५ टक्के लोकांचा मृत्यू झाला. यात रुग्णालयात उशिरा येणे, निष्काळजी करणे, बाधा झाल्याचे उशिरा माहीत होणे आदी कारणे आहेत. तर उर्वरित रुग्णांना इतर आजार होते. त्यांच्या मृत्यूला कोरोनासह इतर व्याधी कारणीभूत होत्या. 

‘घाटी’च्या अधिष्ठाता म्हणतात... 
शंभर दिवसांबाबत घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आपले अनुभव सांगितले. ‘‘३ एप्रिलला घाटी रुग्णालयात पहिला रुग्ण भरती झाला. त्यावेळी आमची २५ बेडची तयारी होती; मात्र आठ जून रोजी एकाच दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. एकाच दिवशी ‘घाटी’मध्येही ३२ रुग्ण भरती झाले.

एका अर्थाने रुग्णांची वाढसातत्याने सुरूच राहणार होती. त्यामुळे विशेष कोविड रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन ‘घाटी’मध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची निर्मिती झाली; पण आता तेही भरत आले आहे. म्हणून सुपरस्पेशालिटीमध्ये एक वॉर्ड शिफ्ट करण्यात आला आहे. हा पॅंडेमिक फार डेंजर आहे आणि झपाट्याने वाढतोय. त्यामुळे नागरिकांना आता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. मास्क आणि हँडवॉश किमान वर्षभराचा तरी आपला सोबती आहेच. सुरक्षित अंतर, योग्य काळजी आपल्याला घ्यावी लागेल. 

कोरोना काळ अन् आपण 

  • प्रशासनाची सुरवात अडखळत झाली. 
  • सुरवातीला बाहेरून शहरात येणाऱ्यांची फक्त स्क्रीनिंग झाली. 
  • क्वारंटाइनची गरज असतानाही धोरणांच्या गोंधळात तसे झाले नाही. 
  • क्वारंटाइनच न झाल्याने काही बाधित रुग्णही बाहेर पडले. संसर्ग वाढला. 
  • समन्वयाच्या अभावामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. 
  • लॉकडाउन असतानाही नागरिकांच्या, व्यवस्थेच्या चुकाही झाल्या. 
  • त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. 
  • घाटी रुग्णालय व इतर रुग्णालयांत अनेक साधने मिळाली नाहीत. 
  • सुरवातीला पीपीई किटही मिळाल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टर आणि इतर स्टाफलाही बाधा झाली. 
  • रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाची जबाबदारी सांभाळताना झाली तारेवरची कसरत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Hundred Days Read The Whole Reality In Aurangabad