महापालिका प्रशासक म्हणतात, नऊ दिवसात तुटेल कोरोनाची साखळी 

माधव इतबारे
सोमवार, 13 जुलै 2020

नागरिकाांचा लाॅकडाऊनला असाच प्रतिसाद मिळाला तर कोरोनाची साखळी तोडण्यात निश्चित यश मिळेल, असा दावा महापालिका प्रशासक आस्तिककुमार यांनी सोमवारी केला. 

औरंगाबाद ः शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, असाच प्रतिसाद उर्वरित दिवसात मिळाला तर कोरोनाची साखळी तोडण्यात निश्चित यश मिळेल, असा दावा महापालिका प्रशासक आस्तिककुमार यांनी सोमवारी (ता. १३) सांगितले. 

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण व बळींच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे १० ते १८ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी संयमाचे दर्शन घडवत प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ दिली. दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी चार दिवसांच्या लॉकडाऊनचा आढावा घेऊन आरोग्य यंत्रणा व महापालिकेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या चाचण्यांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी शहराच्या विविध भागात भेट देऊन तपासणी केली व आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री. पांडेय म्हणाले, ज्या पद्धतीने लोकांनी चौथ्या दिवशीही लॉकडाऊनला प्रतिसाद दिला, ते पाहता आपण नऊ दिवसांच्या लॉकडाऊन काळात कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. पोलीस प्रशासनाने देखील लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरवले आहेत. महापालिकेतर्फे शहरात येणाऱ्या पाचही प्रवेशव्दारावर तपासणी पथके तैनात केली आहेत. त्यामुळे कुणालाही तपासणीशिवाय शहरात प्रवेश दिला जात नाही. 

याशिवाय शहराच्या विविध भागात महापालिकेकडून नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. यातून जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. उर्वरित पाच दिवसांत अधिकाधिक चाचण्या करून पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्याचे काम अधिक केले जाणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन जो संयम दाखवला आहे, तो यापुढेही दाखवावा, आणि शहर, जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहनही पांडेय यांनी केले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दहा पथकांमार्फत तपासणी 
कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार स्वॅब आपल्या दारी मोहिमेअंतर्गत सध्या दहा पथकांमार्फत गल्लो-गल्ली जाऊन स्वॅब घेतले जात आहेत. या अॅन्टीजेन टेस्ट असल्यामुळे रिपार्टही तातडीने येत आहेत, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad