आम्ही नाही सुधारणार... ११ लाखांचा दंड भरला तरी विनामास्कच

माधव इतबारे
Tuesday, 14 July 2020

महापालिकेने एक जूनपासून विनामास्क फिरणाऱ्यांसह इतर अशा तब्बल दोन हजार ३६४ नागरिकांकडून ११ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

औरंगाबाद ः शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेकजण ‘दंड भरू पण सुधारणार नाही’ अशा आविर्भावात आहेत. महापालिकेने एक जूनपासून विनामास्क फिरणाऱ्यांसह इतर अशा तब्बल दोन हजार ३६४ नागरिकांकडून ११ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पण आजही अनेकजण लॉकडाउन असताना मास्क न वापरता घराबाहेर पडत आहेत. 

घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही बंदी आहे. मात्र अनेकजण नियम पाळत नसल्याने महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक मित्र पथकामार्फत शहरात कारवाया सुरू आहेत. आत्तापर्यंत दोन हजार ३६४ जणांकडून ११ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पथकप्रमुख प्रमोद जाधव यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अशा झाल्या कारवाया 
रस्त्यावर थुंकणाऱ्या १ हजार ४५८ नागरिकांकडून १ लाख ४५ हजार ८०० रुपये वसूल. 
विनामास्क फिरणाऱ्या २ हजार ३६४ नागरिकांकडून ११ लाख ८२ हजार रुपये. 
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या ६८० नागरिकांकडून १ लाख २ हजार रुपयांची दंडात्मक रक्कम 

पथकाकडून झालेल्या कारवाया 
प्लॅस्टिकचा वापर ः २५ हजार 
दुकानात गर्दी करणारे ः ५२ हजार 
विनापरवानगी बांधकाम ः ५ हजार 
बायोवेस्टची विल्हेवाट नाही ः १० हजार 
जास्तीचा कचरा करणे ः २७ हजार 

सारीचे पुन्हा ३९ रुग्ण 
कोरोनासोबतच सारी (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) आजार महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या दोन दिवसांत ३९ रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत ‘सारी’ची रुग्णसंख्या ८५७ एवढी झाली आहे. यातील ८५० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता, २८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ५५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ‘सारी’ने आजपर्यंत १७ जणांचा बळी घेतला आहे. मागील दोन दिवसांत ‘सारी’च्या रुग्णांची संख्या ३९ ने वाढली आहे. शनिवारी (ता. ११) २०, तर रविवारी (ता. १२) १९ रुग्ण आढळून आले. यातील आठजणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अयोध्यानगर, शिवशंकर कॉलनीत रुग्ण 
अयोध्यानगर- १३, सातारा परिसर- १६, रेणुकानगर- १०, मसनतपूर- ८, केशरसिंगपुरा- १०, शिवशंकर कॉलनी- ८, मयूरपार्क- ५, मित्रनगर- ४, विष्णुनगर- ४, छावणी भागात- ४, सिडको एन- सहामध्ये चार असे रुग्ण आढळून आले. या भागातील महापालिकेच्या पथकाने धाव घेऊन जंतुनाशकाची फवारणी केली. सर्वांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. लॉकडाउनच्या काळातही या भागातील नागरिकांना घरपोच वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad