अहवाल निगेटिव्ह तरीही जावे लागेल अलगीकरण कक्षात...

माधव इतबारे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

गेल्या काही दिवसांपासून अॅन्टीजेन चाचण्या केल्या जात असून, तातडीने अहवाल प्राप्त होत असल्याने ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांना घरी सोडले जात होते किंवा संशयिताला अहवाल प्राप्त होईपर्यंत अलगीकरण कक्षात नेण्याची गरजही उरली नव्हती. त्यामुळे संशयितांची संख्या कमी होत आहे.

औरंगाबाद ः कोरोनासंदर्भातील उपचारासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून वारंवार बदल केले जात आहेत. यापुढे कोरोनाबाधितांच्या संपर्कांतील हायरिस्क व लोरिस्क संशयितांनाचा अॅन्टीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांना अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. पाच किंवा सात दिवसानंतर स्वॅब घेऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची सुटी केली जाणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. 

बाधित रुग्णांच्या हायरिस्क व लोरिस्क संशयितांचा शोध घेऊन कोरोना साखळी तोडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार कुटुंबातील एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर लगेचच त्याच्या कुटुंबीयांची सुद्धा अँटिजन पद्धतीने तपासणी केली जात होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला त्यांना घरी सोडून फक्त पाच किंवा सात दिवस कुठे फिरू नका, अशा सूचना दिल्या जात होत्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

मात्र आता महापालिकेने नव्याने आदेश प्राप्त झाले असून, निगेटिव्ह आलेल्या संशयित रुग्णांना अलगीकरण कक्षात सात दिवस ठेवले जाणार आहे. हाय रिस्क आणि लो रिस्क या दोन प्रवर्गात संशयितांना ठेवण्यात येणार असून, सातव्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी लाळेचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात येतील. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 

तीन हजारांची क्षमता ७४ दाखल 
महापालिकेने शहराच्या विविध भागातील वसतीगृह ताब्यात घेऊन याठिकाणी अलगीकरण कक्ष तयार केले आहेत. या कक्षांची क्षमता सुमारे तीन हजार एवढी आहे. मात्र सध्या याठिकाणी फक्त ७४ संशयित आहेत. गेल्या काही दिवसांपासून अॅन्टीजेन चाचण्या केल्या जात असून, तातडीने अहवाल प्राप्त होत असल्याने ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांना घरी सोडले जात होते किंवा संशयिताला अहवाल प्राप्त होईपर्यंत अलगीकरण कक्षात नेण्याची गरजही उरली नव्हती. त्यामुळे संशयितांची संख्या कमी होत आहे. नव्या आदेशामुळे मात्र अलगीकरण कक्षातील संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

खरेदी करणार आणखी ५० हजार कीट 
कोरोना चाचणीचा अवघ्या वीस मिनिटात अहवाल देणाऱ्या आणखी ५० हजार अॅन्टीजेन कीट खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी एक लाख कीट महापालिकेने खरेदी केल्या होत्या. त्यामुळे शहरातील चाचण्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. महापालिकेकडे एक लाख अॅन्टीजेन कीट उपलब्ध असताना इतर शहरांना या कीट मिळत नसल्याचे चित्र मध्यंतरी होते. त्यामुळे अनेक शहरांनी महापालिकेशी संपर्क साधून कीट देण्याची मागणी केली. त्यानुसार सोलापूरला पाच हजार तर हिंगोलीला दोन हजार कीट देण्यात आले आहेत. या कीट महापालिकेला परत केल्या जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad