निघाले होते दिल्लीला पण पोचले कोविड सेंटरमध्ये...

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद ः कोरोनामुळे जिल्हाअंतर्गत प्रवेशाला बंदी असली तरी पोलिसांची परवानगी घेऊन अनेक जण प्रवास करीत आहेत. सोमवारी (ता. तीन) जालना येथून चारजण दिल्लीला जाण्यासाठी औरंगाबादला येत होते. त्यांना शहराच्या एन्ट्री पॉइंटवर महापालिकेच्या पथकाने अडविले व अँटीजेन चाचणी केली. त्यात चौघेही पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे त्यांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. ‘आम्हाला विमानाने दिल्लीला जायचे आहे, जाऊ द्या,’ असा तगादा या चौघांनी लावला; मात्र महापालिकेच्या पथकाने त्यांना दाद दिली नाही. 

महापालिकेने कोरोना चाचण्यांसाठी शहरातील सहा एन्ट्री पॉइंटवर सहा पथके नियुक्त केली आहेत. या ठिकाणी २४ तास शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते. शहरात येणाऱ्या प्रत्येकाची तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्यांची (ज्यांच्याकडे ई-पास नाहीत त्यांची) टेस्ट केली जात आहे. या चाचण्यांत ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलविले जात आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

सोमवारी जालन्याहून चारजण शहरात येत होते. ते विमानाने दिल्लीला जाणार होते. सायंकाळी त्यांचे विमान होते. ते शहरात प्रवेश करत असतानाच महापालिकेच्या केंब्रिज स्कूल चौकातील पथकाने त्यांना अडविले. त्यांची अँटीजेन टेस्ट केली. तेव्हा हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतरही त्यांनी आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती केली. मात्र, त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. 

रोजची दीड हजार जणांची तपासणी 
अँटीजेन किट प्राप्त झाल्यापासून शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाची १० जुलैपासून तपासणी केली जात आहे. बाहेरगावाहून आलेल्यांमुळेच शहरात कोरोनाची साथ पसरल्याचे समोर आले होते. त्यामुळे एन्ट्री पॉइंटवर रोज सरासरी १२०० ते १५०० जणांची तपासणी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला त्यांनाच शहरात प्रवेश दिला जात आहे. महापालिकेच्या तपासणीमुळे गेल्या काही दिवसांत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे, असे पथकाचे प्रमुख तथा उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीन हजार चाचण्या, १२३ पॉझिटिव्ह 
महापालिकेने सोमवारी (ता. तीन) शहराच्या विविध भागांत ३१४७ अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या. यात ३००७ अँटीजेन चाचण्यांमधून १२३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सहा एन्ट्री पॉइंटवर एक हजार ४९३ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५२ जण पॉझिटिव्ह निघाले. दोन जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये १३८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार ५१४ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७१ जण पॉझिटिव्ह निघाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com