Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

चौकात बाटली फिरली, त्या दिशेला निघते सर्वेक्षणासाठी हे पथक

औरंगाबाद ः कोरोना संदर्भातील उपाययोजना निश्चित करण्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये किती प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी सिरो सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.११) सर्व्हेक्षणाचा दुसरा दिवस होता. प्रत्येक वॉर्डात ४० जणांच्या रक्ताचे नमुने घेतले जात असून, घरांची निवड करण्याची पद्धत मात्र अफलातून आहे. चिठ्ठ्या टाकून वसाहती निश्चित केल्या जात आहेत. त्यानंतर वसाहतीत पोचल्यानंतर चौकात रिकामी बाटली फिरवून, बाटलीचे तोंड ज्या दिशेला असेल त्या दिशेने जाऊन दहाव्या घरातील नमुने घेतले जात आहेत. 

यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एखाद्या वॉर्डात स्लम भाग किती आहे, याचा विचार केला जातो. त्यानंतर तेथील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतले जाते. त्यानंतर स्लम व इतर भागातून किती घ्यायचे हे ठरविले जाते. एकदा हे आकडे ठरले की नंतर वॉर्डातील वसाहतींच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात. चिठ्ठी उचलून वसाहत ठरविले जाते. वसाहतीत पथक जाते व त्या चौकात एक रिकामी बाटली जमिनीवर फिरविली जाते. ही बाटली थांबल्यावर तिचे तोंड ज्या गल्लीकडे असेल, त्या गल्लीत पथक जाते. तिथे दर दहाव्या घरातील एका व्यक्तीचे रक्त नमुने संकलित केले जातात.

नमुने घेताना ते महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ, कनिष्ठ अशा सर्वांचेच सम प्रमाणात यावेत याचीही दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी पहिल्या दहाव्या घरात ज्येष्ठ महिलेचा, पुढच्या दहाव्या घरात वयाने लहान महिलेचा, त्यानंतर पुढच्या दहाव्या घरी ज्येष्ठ पुरुषाचा आणि त्या पुढच्या दहाव्या घरात वयाने लहान पुरुषाचा रक्त नमुना घेतला जातो. व्यक्तीची निवड देखील एक वृध्द, एक तरुण, एक वृध्द महिला, एक तरुणी अशी करण्यात आली. ४० घरांमधून रक्ताचे नमुने घेताना प्रत्येक गटातील पाच व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. 

घाटीत रुग्णालयात नमुन्यांची तपासणी 
प्रत्येक वॉर्डातून सरासरी ३५ ते ४० जणांचे रक्त नमुने घेतले जात आहेत. या नमुन्यांची घाटीतील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येईल. तपासणीनंतर अॅण्डीबॉडी किती तयार झाली हे समजेल. नमुन्यांच्या तपासणीनंतर त्याच्या माहितीच्या विश्लेषणासाठी घाटीत खास पथक तयार करण्यात आले आहे. घाटीच्या सामाजिक औषधशास्त्र विभागाचे डॉ. जग्गनाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com