औरंगाबादेतील ८४९ जण होम क्वॉरंटाइन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

सध्या कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, असेही यावेळी नमूद करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीत ८४९ जण होम क्वॉरंटाइन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कातील ७२६ जणांसह विदेशातून आलेल्या १७ व इतर अशा ८४९ नागरिकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांवर १४ दिवस लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडण्यास बंदी घातल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शुक्रवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देताना महापौर व आरोग्य अधिकारी म्हणाल्या, की शहरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या महिलेची प्रकृती सुधारली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या महिलेच्या संपर्कात आलेल्या ७२६ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यामध्ये ४२६ विद्यार्थी व इतर ३०० जणांचा समावेश आहे.

हेही वाचा- आता गर्दी कराल तर गुन्हे दाखल होणार

या सर्वांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित खासगी महाविद्यालयातील ७२६ पैकी २० जणांच्या घशात त्रास होत असून, त्यांना सर्दी व ताप असल्याने त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, असेही यावेळी नमूद करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीत ८४९ जण होम क्वॉरंटाइन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. 
 
विदेशातून आलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का 
विदेशातून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. शहरातील रहिवासी असलेले मात्र कामासाठी विदेशात गेलेले १७ नागरिक शहरात नव्याने दाखल झाले आहेत. त्यांनादेखील होम क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. पुढील १४ दिवस त्यांना घराबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 
 
बीटमार्शल ठेवणार लक्ष 
होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये याची काळजी घेतली जाणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या बीटमार्शलवर सोपवली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त पोलिस आयुक्तांना पत्र देणार असून, संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या होम क्वॉरंटाइनची चौकशी बीटमार्शल करतील. 
 
क्वॉरंटाइन केलेले नागरिक 
० महापालिका क्षेत्रात आलेले विदेशी नागरिक-१७ 
-विदेशातून आलेले देशाअंतर्गत नागरिक- २० 
-इतर भारतीय नागरिक- ७२३ 
जिल्हा सामान्य रुग्णालय 
विदेशातून आलेले देशांतर्गत नागरिक- ३८ 
इतर भारतीय- ४८ 
जिल्हा आरोग्य अधिकारीअंतर्गत इतर भारतीय-३ 

हेही वाचा- औरंगाबादेत 28 संशयित रुग्ण होम क्वारंटाईन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad