Corona Virus : सहाशे किलोमिरटर दूर पायी घरी जाण्यासाठी ते निघाले पण झाले भलतेच..

माधव इतबारे
Tuesday, 21 April 2020

निवारागृहात असलेल्या सहा मजूर, कामगारांनी सोमवारी (ता. २०) मध्यरात्री शाळेच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला व हर्सूल येथे त्यांना पकडले. मंगळवारी (ता. २१) पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मजूर, कामगारांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे शहरात १५८ मजुर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळेत करण्यात आली असली तरी घरी जाण्यासाठी वारंवार ते आग्रह धरत आहेत. त्यातून सोमवारी (ता. २०) मध्यरात्री सहा जणांनी शाळेच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला व हर्सूल येथे त्यांना पकडले. मंगळवारी (ता. २१) पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मजूर, कामगारांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभर लॉकडाऊन लागू केला आहे. सुरवातील २२ मार्चला जनता कर्फू पाळण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. केंद्र शासनाने देखील १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मजुर, कामगारांना गावी जाण्याच्या संधीच मिळाली नाही. औरंगाबाद शहरात सध्या १५८ जण अडकून पडले आहेत. त्यांची व्यवस्था सिडको एन-सहा, सिडको एन-सात व जवाहरनगर येथील महापालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे. चहा, नाष्टा, दोनवेळचे जेवण, मनोरंजन, खेळाची साधने, योग प्रशिक्षण, आरोग्य तपासणी अशी सुविधा त्यांना दिली जात आहे. मात्र यातील महिला, तरुण मुले यांनी घरी जाण्याची ओढ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गावाकडील नातेवाईकांचे फोन देखील येत आहेत. त्यामुळे विचलीत झालेले मजुर, कामगार आम्हांला घरी जाऊ द्या, अशी मागणी वारंवार करत आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढली होती. महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त विजया घाडगे या रोजच समजूत काढत आहेत. दरम्यान सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील सहा मजुरांनी सिडको एन- सहा येथील शाळेच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन पोबारा केला. याठिकाणी पोलिस बंदोबस्त असला तरी पोलिस कर्मचारी गेटच्या बाजूने थांबतात. त्यामुळे सुरवातील प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. काही वेळानंतर पोलिसांना माहिती मिळाली. तातडीने त्यांचा शोध घेतला असता हे सर्वजण पायी जात असून, हर्सलपर्यंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा शाळेत आणून सोडले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

तीन मेपर्यंत नाही सुटका 
मजूर, कामगारांना सुरवतील १४ एप्रिलनंतर गावी जाता येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्यात आला. दरम्यान पोलिस आयुक्तांनी २० एप्रिलपर्यंत शासनाचे आदेश प्राप्त होणार आहेत, असे सांगितले होते. मात्र २० तारखेला देखील दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी शेवटी पलायण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारी त्यांची भेट घेऊन आता तीन मेपर्यंत सुटका नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad