होम स्टडी की बालकांना कस्टडी.. नक्वी वाचा अन् विचार करा...

संदीप लांडगे
Friday, 15 May 2020

- शिक्षणाचा ऑनलाइन दिखावा! 
- ‘लर्न फ्रॉम होम’चे स्तोमच जास्त 
- विद्यार्थी, पालकांसमोर अडचणींचा डोंगर
 

औरंगाबाद ः सर, मह्या पोराला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणता... पण तरीही पोरगं मित्राच्या घरी मोबाईलवर ऑनलाइन शाळा भरते, असं म्हणतं. पोरगं मोठा फोन घेण्याचा हट्ट करतंय, सर... आमच्यासारख्या गरिबाला परवडतंय का? अहो, कोरोनामुळे सगळे कामधंदे बंद झालेत. त्याच्या मित्राच्या घरचे येऊ देत नाहीत. त्यामुळं मुलाच्या मनात संकुचित भावना निर्माण होत असल्याचे पालक शिवाजी राठोड यांनी म्हणाले. 

कोरोनामुळे शाळांना मार्चमध्येच सुटी देण्यात आली. तोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. फक्त दुसऱ्या सत्राची संकलित चाचणी व वार्षिक परीक्षा बाकी होती. सातत्यपूर्ण मूल्यमापनामुळे तिथेही काहीच अडले नव्हते. असे असताना ‘वर्क फ्रॉम होम’च्या धर्तीवर ‘स्टडी फ्रॉम होम’ किंवा ‘लर्न फ्रॉम होम’चे पडघम वाजू लागले. शिक्षकही कामाला लागले. बदलत्या काळानुसार बदल करणे गरजेचे आहे, असे म्हणत शाळेमध्ये ई-लर्निंग, व्हॉट्सॲप, झूम अॅप या पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सधन मुलांच्या शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन निकालाचा प्रश्‍न येत नाही. परंतु गरीब, कामगार आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या श्रमिकांची मुले शिकतात, त्या शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी कठीण असल्याचे शिक्षक सांगत आहेत. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   
 
तांत्रिक अडचणी मोठ्या 
प्रत्यक्षात वाड्या-वस्ती, अतिदुर्गम भागात इंटरनेटची समस्या तसेच अनेक शेतकरी कुटुंबातील मुलांकडे अँड्रॉईड फोनच उपलब्ध नाही. गरीब मजुरी करणाऱ्या कामगारांकडे मोबाईलच नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे, त्यांना रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत. काहींकडे पैसे आहेत; मात्र रिचार्ज करण्यासाठी मोबाईलची दुकानेच उघडी नाहीत यासारख्या एक ना अनेक अडचणी पालकांना येत आहेत. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

उन्हाळ्याची सुटी 
लागली तरी वर्ग सुरू
 
तीन मेपासून सर्व शाळांना उन्हाळ्याची सुटी देण्यात येते; परंतु विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास करावा म्हणून ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जात आहे. दरदिवशी शिक्षकांकडून एकाचवेळी चार ते पाच लिंक ऑनलाइनद्वारे पाठवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त अभ्यासाचा ताण पडत आहे. परिणामी दिवसभर मोबाईल मुलांच्या हातात राहतो. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

 
कोरोनाच्या ऐन कहरात विद्यार्थ्यांवर शैक्षणिक आघात करत उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांचे बालपण हिरावून घेणाऱ्या ‘लर्न फ्रॉम होम’ या संकल्पनेने चिमुकल्यांचा व पालकांचादेखील ताण वाढवला आहे. ‘लर्न फ्रॉम होम’चा फायदा लाखो विद्यार्थ्यांना होत असल्याचा कांगावा करण्यात येतोय. मात्र, ज्या ‘दीक्षा अॅप’द्वारे हा सर्व द्रविडी प्राणायाम होतोय, त्या अॅपचा उपयोग करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
- राजेश हिवाळे (राज्य प्रसिद्धिप्रमुख, राज्य प्राथमिक शिक्षक संघ) 

आमच्या गावात मोबाईलला रेंज मिळत नाही. इथं अन्नधान्य घ्यायला पैसे नाहीत, तर मोबाईल कधी रिचार्ज करायचा? सध्या उसनवारीवर दिवस काढणे सुरू आहे. कोरोनामुळे समस्या वाढत असताना मुलांना सुटी द्यायची तर ऑनलाइन शिकवण्या सुरू केल्यात. त्यामुळे मुलंपण मेटाकुटीला आली आहेत. 
- भाऊसाहेब शेळके (पालक व शेतकरी, भिवधानोरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Updates Learn From Home During Lockdown Aurangabad