औरंगाबादमध्ये कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, ४६ अतिसंवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

औरंगाबाद : शहरात ‘कोविड-१९’ चे रुग्ण वाढत आहेत. रविवारी (ता. १०) रामनगर, चंपाचौक, वसुंधरा कॉलनी या तीन नवीन भागात कोरोनाने शिरकाव केला. दोन दिवसांत आठ भागांत कोरोनाबाधित सापडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संजयनगरचे कनेक्शन रामनगरमध्ये झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहरात आतापर्यंत ४६ भाग अतिसंवेदनशील झाले आहे. 

शहरात शनिवारी दिवसभरात बाबर कॉलनी, भवानीनगर, सिल्कमिल कॉलनी, रामनगर, पानचक्की आणि जुनाबाजार या नवीन भागांत कोरोना पॉझिटिव्ह निघाले. रविवारी सकाळीच कोरोनाचे आणखी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता सिडकोतील एन-सात येथील वसुंधरा कॉलनी, रामनगर व जुन्या शहरातील चंपा चौक या तीन भागांत कोरोनाने शिरकाव केला आहे. मागील दोन दिवसांत कोरोनाने पुन्हा आठ नवीन वसाहतींत शिरकाव केला असून, या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परवापर्यंत कोरोनाच्या अतिसंवेदनशील भागांची संख्या ३८ होती, त्यात आता आठ भागांची भर पडली असून, शहरातील ४६ भाग अतिसंवेदनशील झाले आहेत. 

अस्वस्थ वर्तमान 
  
रामनगरमध्ये १९ रुग्ण 
रामनगरमध्ये पहिल्याच दिवशी १९ रुग्ण आढळून आल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. दाटवस्तीचा हा भाग असल्याने या भागात संसर्ग झपाट्याने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. संजयनगर आणि रामनगर हे दोन्ही भाग अत्यंत जवळ आहेत. त्यामुळे संजयनगरचे कनेक्शन रामनगरमध्ये झाले असावे असा संशय व्यक्त होत असला तरी आरोग्य विभागाकडून रामनगरमध्ये बाधित रुग्णांची हिस्ट्री तपासली जाणार आहे.

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली

सिडको एन-सातमधील वसुंधरानगरमध्ये एक रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. चंपाचौक परिसरात संपर्कातल्या संपर्कातून लागण झाली आहे. अतिसंवेदनशील भागात कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवीत आहे. मात्र, रोज नवीन रुग्णांची भर पडत असल्याने महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. 

रविवारी (ता. १०) दिवसभरात काय घडले 
 
जिल्हा रुग्णालय 

  • जिल्हा रुग्णालयातून आठ कोरोनामुक्त झालेल्यांना सुटी 
  • जिल्हा रुग्णालयात आज ३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. 
  • ४६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा. 
  • ८९ कोविडबाधितांवर विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरू 

 
घाटी रुग्णालय 

  • -४२ जणांवर उपचार सुरू, एकाचा मृत्यू. 
  • -सायंकाळी चारपर्यंत एकूण ४१ रुग्णांची तपासणी. 
  • -त्यापैकी २१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. 
  • -घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ४२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू. 
  • -त्यापैकी ४१ रुग्णांची स्थिती सामान्य. दोन रुग्णांची स्थिती गंभीर. 
  • -३४ कोविड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas New Hotspot In Aurangabad