औरंगाबाद : म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर, गजानननगर, सातारा नवे नऊ हॉटस्पॉट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शहरातील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांना क्वॉरंटाइन करणे व स्वॅब घेण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरात कोरोना हॉटस्पॉटच्या संख्येत रोज नव्याने भर पडत आहे. ज्या भागात रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामध्ये म्हाडा कॉलनी, भारतनगर, शिवाजीनगर, अंबिका कॉलनी, गजानननगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, एसटी कॉलनी, सातारा, देवळाई हे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. 

जिल्हाभरात कोरोनाचे वेगाने संक्रमण होत असल्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत एक हजार रुग्ण वाढले आहेत. शहरी भागात तर शंभरपेक्षा अधिक रुग्ण रोज आढळून येत असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रत्येकजण प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे. त्यामुळेच अनेकांनी नातेवाइकांशीही संपर्क तोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपासून बाधितांचा आकडा दोनशेपेक्षा अधिक संख्येने निघत आहे. त्यातच शहरासोबतच ग्रामीण भागातही बाधित रुग्ण वाढत आहेत. 
शहरात रविवारी (ता. २८) यापूर्वी ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते, त्या वसाहतीतच पुन्हा बाधितांची संख्या वाढतच असल्याने या वसाहती नव्याने हॉटस्पॉट ठरत आहेत.

प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

रशीदपुरा भागात एक, धूत हॉस्पिटलसमोरील म्हाडा कॉलनीत सात, भारतनगर सात, शिवाजीनगर पाच, गजानननगर सहा, अंबिकानगर सहा, इंद्रप्रस्थ सिडको चार, एसटी कॉलनी पाच याप्रमाणे बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे या वसाहती नव्याने हॉटस्पॉट ठरल्या आहेत. या भागात औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांना
घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
चार झोन कोरोनामुक्त 
चार कंटेनमेंट झोनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने कोरोनामुक्त झोन म्हणून महापालिकेने जाहीर केले आहेत. त्यापूर्वी संबंधित भाग कंटेनमेंट झोन म्हणून समजून तिथे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात होत्या. महापालिका प्रशासनाकडून नुकताच कोरोनाबाधित आणि कंटेनमेंट झोनचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार किलेअर्क, संजयनगर, बहादूरपुरा आणि नूर कॉलनी हे चार कंटेनमेंट झोन कोरोनामुक्त झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी आता कोरोनाचा रुग्ण नाही, असा दावा केला जात आहे. परिसर सील करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना या परिसरात करण्यात आल्या आहेत. सलग २८ दिवस या परिसरातील विविध भाग सील ठेवण्यात आले होते. 
  
१९ हजार ७८५ जणांची चाचणी 
शहरातील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांना क्वॉरंटाइन करणे व स्वॅब घेण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार प्रतिदहा लाख लोकसंख्येमागे कोरोना चाचण्यांचे प्रमाण १५,३८८ एवढे असणे आवश्यक आहे. शहरात आजपर्यंत १९,७८५ चाचण्या झाल्या आहेत. भविष्यात कोरोना रुग्णांची रोजची संख्या ५०० च्या प्रमाणात वाढली तरी त्यांच्या उपचाराचे व संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.

त्यांनी सांगितले की, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढणारच होती. तरीही रुग्णांच्या वाढत्या संख्येला रोखण्यात महापालिकेच्या यंत्रणेला शहरात यश आले आहे. आजघडीला वेगाने वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता ती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णांच्या संपर्कातील किमान १५ व्यक्तींना शोधून त्यांना क्वॉरंटाइन करण्याबरोबरच अधिकाधिक व्यक्तींच्या स्वॅबची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's nine new hotspots at Aurangabad