औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी, बिस्मिल्ला कॉलनीतील वृद्धेचा मृत्यू, रुग्णसंख्याही वाढली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

शहरातील कोरोनाचा हा तिसरा मृत्यू आहे. हे तीनही मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. आता आणखी एक रुग्ण कोरोना झिटिव्ह आल्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २९ झाली आहे.  

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय-घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 65 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा शनिवारी (ता. १८) सकाळी पावणे सात वाजता मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली. शहरातील हा कोरोनाचा तिसरा बळी आहे. तर आणखी एक १५ वर्षीय मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. 

बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या या वृद्धेवर अगोदर जसवंतपुरा-किराडपुरा मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून त्यांनी आणखी एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात येऊन संबंधित रुग्णालयही सील करण्यात आले होते. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

घाटी रुग्णालयाच्या स्वतंत्र अलगीकरण कक्षात उपचार सुरू असताना त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. 16 एप्रिलला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना स्पेशल कोरोना वार्डात हलवण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले होते.

शहरातील कोरोनाचा हा तिसरा मृत्यू आहे. हे तीनही मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. आता आणखी एक रुग्ण कोरोना झिटिव्ह आल्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २९ झाली आहे.  

आज आणखी एक पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २९वर

दरम्यान, बायजीपुयातील १५ वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी बायजीपुयातील १७ वर्षीय मुलाला लागण झाल्याचे समोर आले होते.

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

तो १० एप्रिलला गरोदर आईला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून औरंगाबादला आला होता. त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यात आईचा आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला. आता त्याच कुटुंबात १५ वर्षीय मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यामुळे यंत्रणेची झोप उडाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Patient Positive Patient Dead In Aurangabad Maharashtra