लोकं ऐकेनात : अफवांच्या बाजारात मटणावर उड्या

Aurangabad news
Aurangabad news

फुलंब्री : कोरोना व्हायरसचा प्रसार कोंबड्यांच्या माध्यमातून होत नसल्याचे पशुसंवर्धनमंत्र्यांनी व इतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट करून तसेच जनजागृती करूनही अफवांच्या बाजारामुळे अजूनही चिकनचा दर उतरलेलाच आहे. दुसरीकडे खाद्यप्रेमींनी चिकनच्या दुकानाकडे पाठ फिरवत मटनांच्या दुकानासमोर रांगा लावल्याचे दिसून येत आहे. 

एकीकडे चिकनचे भाव मातीमोल झाले असताना जास्त दराने विक्री होणाऱ्या मटनासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे दिसून आले. फुलंब्री व परिसरातील अनेक मटनांच्या दुकानांवर सकाळपासून ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. चिकन खरेदीकडे मात्र कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने पसरविण्यात आलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मटनाचे दर चांगलेच वाढले.

रविवार आणि मटनाचे नाते मांसाहारप्रेमींना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातच ‘कोरोना व्हायरस' चा अप्रत्यक्ष फटका पोल्ट्री उद्योगांना बसला आहे. आधीच मटनाचे दर भडकलेले असताना कोरोना व्हायरसच्या भीतीने चिकनकडे ग्राहकांनी काणाडोळा केला आहे. परिणामी मटनाचे दर ५५० रुपये किलोवर गेलेले असतानाही ग्राहकांनी मटनालाच पसंती देत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात सापडला आहे.

सुशिक्षित बेरोजगार पुन्हा अडचणीत

फुलंब्री तालुक्यात पारंपरिक शेतीव्यवसाय असणाऱ्या अनेक कुटुंबीयांनी या शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला, तसेच उत्पन्नात आर्थिकदृष्ट्या वाढही होऊ लागली. त्यामुळे या व्यवसायात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली,

म्हणूनच की काय, हाताच्या बोटावर असणारी पोल्ट्रीची संख्या शेकडोवर जाऊन पोचली; परंतु काही दिवसांपासून या व्यवसायाला चांगलीच घरघर लागली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार पुन्हा बेरोजगार होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येऊ लागले आहे.

अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना धक्का

वास्तविक पाहता वैद्यकीय तज्ज्ञांकडून मांसाहार करण्यापूर्वी ते चांगल्या पद्घतीने शिजवून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सोशल मीडियातून केवळ चिकनबाबत अपप्रचार होत असल्याने याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोल्ट्रीधारकांच्या चिकन खरेदीची पट्टी ३० रुपयांवर निघाली असताना बाजारपेठेत चिकन सेंटरला भाव केवळ ५० ते ६० रुपये किलो असल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com