Coronavirus :संशय मनी का आला...मानसोपचारतज्ञांकडे वाढले फोन 

file photo
file photo

औरंगाबाद -  संगीत संशयकल्लोळ या नाटकातील " संशय का मनि आला । कळेना । कारण काय तयाला ' या नाट्यपदाच्या ओळींचे कोरोना महामारीच्या काळात स्मरण होण्यासारखी परिस्थिती झाली आहे. 

सुरुवातीला कोरोना साथीला सहजतेने घेणाऱ्याच्या मनात राहून राहून भिती निर्माण येत आहे की आमच्या कॉलनीत, आमच्या बिल्डिंगमध्ये बाहेरगावाहून एकजण आला आहे, घशात किंचित खवखवल्यासारखे होतेय मग मला कोरोना झाला असेल का अशी संशयीवृत्ती वाढत आहे. यातून शहरात गेल्या चार पाच दिवसांपासून मानसोपचार समुपदेशकांकडे विचारणा करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यावर तुम्ही स्वत:ची पूर्णपणे काळजी घेत असाल, कोणाच्या संपर्कात येत नसाल तर आधी स्वत:ला प्रतिप्रश्‍न विचारा की मला कोरोना का होईल किंवा नाही या कारणांचा शोध घ्या, मनातील भिती निघून जाईल असा सल्ला दिला जात आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाच्या साथीने देशात प्रवेश केला तेव्हा अनेकांनी घरात बसून त्यावर गाणी तयार केली, मिम्स तयार केले तर काहीजण आम्हांला कसली आलीय भिती या थाटात कोणत्याही सुरक्षात्मक उपायांशिवाय वावरत होती. मात्र शहरात जशी जशी बाधितांची, क्वॉरंटाईनची संख्या वाढत जात आहे तशी कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती वाढत आहे. 

सध्या संचारबंदीमुळे व कार्यालयांना सुटी असल्याने घरात सर्व सदस्य एकत्र आहेत. घरात कोणाला थोडी जरी शिंक आली किंवा घसा जरी खाकरला तरी त्याच्यावर ताप आलाय का, घसा दुखतोय का, श्‍वास घ्यायला काही अडचण येतेय का प्रश्‍नांचा भडिमार सुरु होत आहे. आपल्याला कोरोना होऊ शकतो का, आपल्या मुलाबाळांचे कसे होइल अशा विचार करत असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मनाचे समाधान करून घेण्यासाठी फोन सुरू 

मानसोपचारतज्ञ डॉ. संदीप शिसोदे म्हणाले, कोरोनांची संख्या जशी जशी वाढत आहे तसे लोकांचे फोन येत आहेत. गेल्या चार पाच दिवसांपासून फोन वाढले आहेत. दिवसाला किमान २० ते २५ जणांचे फोन मनाचे समाधान करून घेण्यासाठीचे आहेत. मला वाटतेय की मला कोरोना होइल, आमच्या कॉलनीमध्ये एकजण कोरोनाग्रस्त शहरातून आला आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये एकजण बाहेरगावी दौरे करायचा त्याला झाला असेल तर मग आम्हालाही होऊ शकतो का, कारण एकाच जिन्याने आम्ही जा ये करतो असे बहुतांश लोकांचे प्रश्‍न असतात.

एकजण तर म्हणाला रात्री उशिरा झोप लागते. झोपेत मला श्‍वास घेण्यास त्रास जाणवत आहे आणि कोणाला आवाज दिला तर माझ्या जवळ कोणीही येत नाही असे स्वप्न पडल्याचे त्यांनी सांगितले. फोनवरच फोन करणाऱ्यांच्या मनातील ही भिती घालवण्याचे काम सुरु आहे. साधारणत: फोन करणारे उच्च शिक्षित आणि त्यांची अर्थिकस्थिती खूप चांगली आहे असेच आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

आरोग्य चांगले ठेवण्याची संधी 

  •  डॉ. शिसोदे म्हणतात एखाद्या विषयाची सतत चर्चा ऐकून, बघून मानवी मनाचे खेळ सुरू होतात. एखाद्या गोष्टीच्या दहा लक्षणांपैकी एक लक्षण दिसले तर मन इतर नऊ लक्षणे जुळवण्याचा प्रयत्न करते ही एक नैसर्गिक क्रिया असते. उलट प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला प्रतिप्रश्‍न विचारावा मला कोरोना कोणत्या कारणांमुळे होऊ शकतो किंवा कोणत्या कारणांमुळे होऊ शकणार नाही या कारणांचा विचार करून मनातील भिती घालवता येईल. 
  •  रणांगणावर लढणाऱ्या योद्ध्याला प्रतिस्पर्ध्याकडून तलवारीचे वार होणार हे माहीत असते म्हणूनच योद्धा ढाल घेऊनच रणांगणात उतरत असतो. तशी आपली उत्तम रोगप्रतिकारशक्ती हीच कोरोनाविरूद्ध लढण्याची ढाल आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठीची जाणीव करून देणारी ही एक संधी समजावे आणि आरोग्य चांगले ठेवावे 
  •  केंद्र सरकार, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोनाची कोणती लक्षणे सांगितली आहेत हे नीट लक्षात ठेवावे आणि सांगितलेल्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. घरातच बसून राहावे, गरज असेल तरच तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर कामापुरतेच जावे. 
  •  भिंतीला खेटून उभे राहणे, जिन्यावरून हात लावत चढणे , उतरणे असे कुठेही अनावश्‍यक स्पर्श टाळा. 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com