राज्यातील 80 शिक्षकांनी एकत्र येवून तयार केले झेडपी लाईव्ह एज्युकेशन चॅनल... विद्यार्थी घेताहेत लाभ

संदीप लांडगे
Saturday, 25 July 2020

तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरातील ८० शिक्षकांनी एकत्र येऊन झेडपी लाईव्ह एज्युकेशन हे यूट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. 

औरंगाबाद ः तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरातील ८० शिक्षकांनी एकत्र येऊन झेडपी लाईव्ह एज्युकेशन हे यूट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. परंतु ऑनलाइन शिक्षण देण्यासही अनेकवेळा विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. कधी मुलांना वेळेवर फोन उपलब्ध न होणे, मोबाईलला रेंज नसणे, इंटरनेटचा अडथळा, लाइट नसणे अशा विविध समस्या येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य होत नव्हते. ही बाब लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक गजेंद्र बोंबले, नितीन अंतरकर यांच्या कल्पकतेतून ‘घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा’ या उपक्रमाअंतर्गत ‘झेडपी लाईव्ह एज्युकेशन’ हे यूट्युब चॅनेल इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सुरू केले.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  
 
यामध्ये इयत्तानिहाय मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास तसेच इतर विषयांच्याही तासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्तीवर आधारित, मार्गदर्शन, कृतियुक्त अध्यापन पद्धतीचा वापर करून आनंददायी शिक्षण देण्यास सुरवात केलेली आहे. याद्वारे सर्व शिक्षक २१ व्या शतकातील कौशल्याचा विकास कसा होईल याचादेखील विचार करून शिकवत आहेत. मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ नयेत, यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या यूट्युब चॅनेलला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे नारायण शिंदे, हनुमान गिराम (रत्नागिरी), श्‍याम गिरी (परभणी), विकास कपाटे (सिंधुदुर्ग) यांनी पुढाकार घेतला आहे. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

१३ जुलैपासून हा उपक्रम सुरू केला असून महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलांना ज्यावेळी मोबाईल, इंटरनेट उपलब्ध होईल, तेव्हा मुले हे यूट्युब चॅनेल पाहून आपला अभ्यास करू शकणार आहेत. याबाबत पालकांची चांगली प्रतिक्रिया येत आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- गजेंद्र बोंबले (जि.प. शिक्षक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Updates ZP Live Education Channel for Students Aurangabad