दरोडेखोरांचा धुमाकूळ; अनेकांना टॉमीने जबर मारहाण

नानासाहेब जंजाळे
Wednesday, 16 September 2020

शेंदूरवादा (ता.गंगापूर) शिवारातील गट क्रमांक ४६ मधील शेतवस्तीवर सात जणांच्या दरोडेखोर टोळीने धुमाकूळ घातला. त्यात वस्तीवरील अनेकांना टॉमीने जबर मारहाण करून रोख रक्कमेसह ५० हजारांचा दागिन्याचा ऐवज चोरला.

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : शेंदूरवादा (ता.गंगापूर) शिवारातील गट क्रमांक ४६ मधील शेतवस्तीवर सात जणांच्या दरोडेखोर टोळीने धुमाकूळ घातला. त्यात वस्तीवरील अनेकांना टॉमीने जबर मारहाण करून रोख रक्कमेसह ५० हजारांचा दागिन्याचा ऐवज चोरला. ही घटना बुधवारी (ता.१६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाळूज येथील पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहीती अशी की, शेंदूरवादा शिवारातील गट क्रमांक ४६ मध्ये इनामी शेतावर सय्यद गुलाब सय्यद बनेसाहाब (वय ५१) हे आपल्या कुंटुंबासह वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे कुंटुबातील रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. त्यात दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सदर सय्यद हे दार उघडून घराच्या बाहेर येताच त्यांना समोर सात चोरटे दिसून आले. त्यांनी विचारपूस करताच त्या चोरट्यांनी सय्यद यांच्या डोक्यावर लोखंडी टॉमीचा जोरदार प्रहार करून त्यांना जखमी केले.

मराठवाड्याचे मागासलेपण संपणार की नाही? ऊसतोड मजुरांचे स्थलांतर, पाणीटंचाई सुरुच...

नंतर मुलगा रियाज हा काकाला फोनवरून घटनेची माहिती देत असल्याचे चोरट्यांना कळताच त्यांनी भलामोठा दगड त्यांच्या खोलीच्या दरवाजावर टाकून त्यालाही टॉमीने जोरदार मारहाण केली. यावेळी शेतकरी व दरोडेखोर यांच्यात चांगलीच झटापट झाल्याने रियाजने एका चोरट्याच्या तोंडावर ओरखडले आहे. या घटनेत दोडेखोरांनी घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

मुलगा रियाजने सदरची माहिती आसपासच्या नागरिकांना देताच ते येईपर्यत चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सय्यद गुलाब यांनी वाळूज पोलिस ठाणे गाठून घटनेची फिर्याद दिली, असुन घटनेचे माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदिप गुरमे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहीती घेतली. या प्रकरणी फिर्यादीवरून पोलिसांनी सात दरोडेखोर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास लक्ष्मण उंबरे, नारायण बुट्टे, पांडुरंग शेळके, प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Gang Beaten People Aurangabad News