कुख्यात गुन्हेगाराची टोळक्याने केली हत्या ! औरंगाबादेतील घटना.  

khoon padegaon.jpg
khoon padegaon.jpg

औरंगाबाद : जून्या वादाचा वचपा काढत चौघा संशयितांनी कुख्यात गुन्हेगाराची निघृण हत्या केली. गुरुवारी (ता.१७) रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना समोर येताच शुक्रवारी (ता.१८) सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अझहर मोहम्ंमद हनीफ (२३, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) असे मृत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी सात वाजेदरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. 

पडेगावातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या चैतन्यनगरात चार महिन्यांपुर्वी ‘तू आमच्या मुलांना दमदाटी का करतो’, यावरुन महंमद अझहर याचे सलीम पटेल याच्या टोळक्याशी भांडण झाले होते. त्यावेळी अझहरच्या पोटात शस्त्राने वार करण्यात आला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अझहर हा घरी मटण घेऊन आला. त्यानंतर त्याने बहिण यास्मिनला ‘तू जेवण बनवून ठेव मी जेवण करायला येतो’ असे म्हणून तो घराबाहेर निघून गेला.

रात्री साडेदहाच्या सुमारास घरी आल्यानंतर बाहेर काम असल्याने ते पूर्ण करुन येतो. असे म्हणून पुन्हा निघून गेला. त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास अझहर घरी आला. त्यावेळी देखील त्याने बाहेर काम आहे, असे म्हणून कपाटातील दहा ते पंधरा हजार रुपये घेतले. याचवेळी त्याने रोहन येरलेला भेटायला जात असल्याचे सांगितले. त्याला बहिणीने जेवण करुन घरात झोप असे म्हटल्यानंतरही तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास अन्सार कॉलनीजवळ असलेल्या शेळी-मेंढी पालन विकास महामंडळाच्या शेतीतील भिंतीच्या कोपऱ्याजवळ अझहरचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पाच ते दहाच्या फुटावर त्याचे कपडे पडलेले होते. त्याच्या डोक्याला, हातापायाला मारहाणीच्या जखमा होत्या. तसेच कंबरेच्यावर शस्त्राने वार केला होता. पोलिस नियंत्रण कक्षाकडून घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे, गुणाजी सावंत, गुन्हे शाखा निरीक्षक अनिल गायकवाड, मनोज पगारे, सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय जाधव व पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात यास्मिन महंमद हनीफ (२६) हिच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
चौघांना अटक, खूनाची कबुली 
या प्रकरणात शेख रिजवान शेख (२३), सलीम करीम पटेल (२५ रा. दोघेही रफद कॉलनी, साईमदीर, पडेगाव) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून विश्‍वासात घेऊन अधिक विचारपूस केल्यानंतर शेख रिजवान आणि सलीम पटेल या दोघांनी हा गुन्हा साथीदार गोरख ब्रम्हकर आणि लखन जारवाल यांच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे. 

परिसर केला सील, श्‍वानाला पाचारण 
अझहरच्या मृतदेहापासून सुमारे शंभर फुटावर रक्त सांडलेले होते, तर त्याचे कपडे मृतदेहापासून पाच ते दहा फुटावर पडलेले होते. यावेळी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी दाखल झाल्यावर त्यांनी परिसर सील केला. अझहरच्या मृतदेहाजवळ असलेले पुरावे यावेळी लॅबच्या कर्मचाऱ्यांनी गोळा केले. 

मोबाईल, पैसेही गेले 
पहाटे घरातून बाहेर पडलेल्या अझहरकडे दहा ते पंधरा हजारांची रोकड आणि मोबाईल होता. मात्र, त्याच्या कपड्यांमध्ये पोलिसांना रोख आणि मोबाईल नसल्याचे आढळून आले. तीन दिवसांपुर्वीच अझहरने नवा मोबाईल खरेदी केला होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.  

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com