बेदम मारणाऱ्या दरोडेखोरांना रिकाम्या हाती पळवले

Aurangabad News
Aurangabad News

कायगाव (जि. औरंगाबाद) : दरोडेखोर येतात, बेदम मारहाण करतात, यात कधीकधी एकदोघांचे जीवही जातात. मिळेल तो मुद्देमाल घेऊन टोळी पसार होते, असे आपण नेहमीच पाहत, ऐकत आलो आहोत. पण औरंगाबाद जिल्ह्यात शेतवस्तीवर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना मात्र रिकाम्या हाती पळावे लागले आहे. 

कायगाव (ता.गंगापूर) येथे शेतवस्तीवर राहणाऱ्या दोन ठिकाणच्या शेतकरी कुटुंबांवर मोठा बाका प्रसंग उद्भवला होता. मध्यरात्री आलेल्या दरोडेखोरांनी अंधारात काठी, दगडाने बेदम मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.28) मध्यरात्री दीड ते दोन दरम्यान घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार चिप्स कंपनी जवळ शेतवस्तीवर राहत असलेले कोंडीराम चित्ते (वय 55) यांना अज्ञात दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. तेथे आरडाओरडा झाल्यानंतर तेथून गंगापूर कायगाव राज्यमार्ग रोडवर शेतवस्तीला असलेल्या किशोर विठ्ठलराव गायकवाड (वय 37) या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा या दरोडेखोरांनी ठोठावला.

दार उघडताच त्यांना बेदम मारले

दार उघडण्यास सांगितले.त्यांनी दार उघडताच त्यांना बेदम मारले. पण तिथेही त्यांच्या घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने लगतच असलेले शेजारी मदतीस येत असल्याचे पाहून चोर सोनं, चांदी, दागदागिने, पैसे अडका न घेताच पळाले. 

पण या मारहाणीत हा शेतकरी मात्र गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या पाठीवर जबर मुकामार, तर डोळ्यांना, हातापायालाही मार लागला आहे. सध्या गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच तात्काळ गंगापूरचे पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुंढे हे पोलीस सहकारी घेऊन दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून औरंगाबाद नगर हायवे रोड वर आणि कायगाव, भेंडाळा फाटा येथे वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दोन ठिकाणी शेतकऱ्यांना मारहाणीच्या घटना घडल्याने शेतकरी लोकात घबराटीचे वातावरण आहे.

मात्र  शेतकऱ्यांनी एकमेकांना दूरध्वनीद्वारे दक्ष केल्यामुळे चोरांना काही ऐवज चोरून नेता आला नाही. पण त्यांनी शेतवस्तीवर धुमाकूळ घालत लाथा बुक्यांनी आणि काठीने जबर मारहाण करून दहशत निर्माण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com