आम्ही जनतेत जातोय, सत्ताधाऱ्यांना त्याचाच त्रास होतोय...! कुणी केला सरकारवर घणाघाती आरोप?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

सध्याचे सरकार कोरोनाशी लढण्यात शंभर टक्के अपयशी ठरलेले आहे. कोरोनाचे आकडे लपवण्याचीच चिंता या सरकारला आहे. मुंबई, ठाणेसारख्या भागांत साठ टक्के रुग्ण व ७३ टक्के मृत्यू झाले, तरीही ठोस उपाय नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

औरंगाबाद - लोकांत जाऊन अडचणी, दुःख समजून घेण्याचा अधिकार विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आहे. ते फिरत नाहीत; पण आम्ही फिरलो तर त्याचा त्यांना त्रास होतो. पण आम्ही फिरणारच, असा निर्धार गुरुवारी (ता.नऊ) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत व्यक्त केला. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

कोरोनाशी लढण्यात सरकार अपयशी
घाटी रुग्णालयात पाहणी केल्यानंतर श्री. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. समांतर सरकार चालवत असल्याचा इन्कार करीत ते म्हणाले, की सरकार कोरोनाशी लढण्यात शंभर टक्के अपयशी ठरले. कोरोनाचे आकडे कसे कमी दिसतील याचीच सरकारला चिंता होती. मुंबई, ठाणेसारख्या भागांत साठ टक्के रुग्ण व ७३ टक्के मृत्यू झाले, तरीही ठोस उपाय नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबई, ठाण्यात डॉक्टर्सना तीनपट जास्त वेतन मिळते. त्यामुळे त्यांचा तिकडे ओढा असून इतर महापालिका क्षेत्रात डॉक्टर्स, नर्सची कमतरता भासते. औरंगाबादेतील लॉकडाउनला विरोध असण्याचे कारण नाही; पण टेस्टिंग वाढवावी. आता रॅपिड टेस्टिंगचा किटचा उपयोग व्हावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार हरिभाऊ बागडे, गिरीश महाजन, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, विजया रहाटकर, खासदार भागवत कराड, शहराध्यक्ष संजय केणेकर, अनिल मकरिये, विजय औताडे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरूळे उपस्थित होते. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

फडणवीस म्हणाले... 

  • घाटीला पाच वर्षांत आम्ही सर्व दिले. आता तेथील पदांना मान्यता सरकारने द्यावी 
  • सरकार पडणार असे दाखवायचे आणि माध्यमांना खेळवायचे. 
  • कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी सरकार लोकांचे लक्ष विचलित करीत आहे. 
  • खत बांधावर नाही मिळाले तरी चालेल; पण निदान शेतकऱ्यांना खत तरी द्या 
  • शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफीची घोषणा केली, आता बिल माफ करा 
  • ‘सारथी’ची मोडतोड करण्याचे काम थांबवावे. कुरघोडी, अंतर्विरोध थांबवावा 
  • परीक्षांबाबत राजकीय इगो नको. 

घाटीत केली पाहणी 
श्री. फडणवीस यांनी घाटीत पाहणी केली. याबाबत ते म्हणाले, की घाटीत पाहणी करून अधिष्ठातांकडून आढावा घेतला. स्टाफची अडचण असून, रुग्णांना औषधी बाहेरून आणावी लागतात. सुरवातीला औरंगाबादचा मृत्युदर जास्त होता; पण आता दर स्थिरावत आहे. रुग्ण गंभीर होण्याआधीच त्याला तातडीने उपचार मिळावेत. प्रशासनाने याची तयारी करावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनांचा लाभ कोविड रुग्णांसह इतर रुग्णांना मिळावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis accuses the ruling party