तुमचे आरक्षण काढले जाईल हा अफवा : देवेंद्र फडणवीस

file photo
file photo

औरंगाबाद:  देशातील बहुभाषिक समाजात फुटीरतेचे बीजारोपण करण्याचे काम केले जात आहे. आपली संस्कृती वेगळी असल्याचे भासविले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवल्या जात आहेत. तुमचे आरक्षण काढले जाईल, तुम्ही भारतीय नाही, असे सांगून समाजा-समाजा मध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. राजकीय पक्ष मताच्या राजकारणासाठी समाजात फूट पाडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न असलेल्या देवगिरी कल्याण आश्रमातर्फे देवगिरी प्रांताचा अग्रेसन भवन येथे 11 व 12 जानेवारीदरम्यान कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास रामकृष्ण मिशन आश्रमचे विष्णुपादानंद स्वामी, पश्‍चिम क्षेत्र संघटनमंत्री संजय कुलकर्णी, भपेंद्रसिंग राजपाल, प्रांत अध्यक्ष चैत्रण पवार, प्रांत सचिव मंदार म्हस्कर, आनंद पाठक, सुहास वैद्य, ऍड. शुभदा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मंदार म्हस्कर यांनी प्रास्ताविक केले. 

खोटे व्हॉटस्‌ऍप संदेश पसरवून बुद्धीभेद

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की देशात आदिवासींना लक्ष्य केले जात होते. मात्र वनवासी कल्याण आश्रमाने ते होऊ दिले नाही. वनवासी समाजातही फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काही राजकीय पक्ष मतांच्या राजकारणासाठी समाजात हे करीत आहे.

मात्र, आपण संस्कृती जतन केलेले लोक आपण आहोत. चुकीच्या बातम्या देण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आज गावागावात मोबाईल पोचविल्या जात आहे. खोटे व्हॉटस्‌ऍप संदेश तयार करून पसरवून बुद्धीभेद तयार करायचा, लोकांमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगायच्या हे फुटीरतेचे प्रकार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

ते शिवसेनेने ठरवावे 

औरंगाबाद कि संभाजीनगर प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, की राज्यात यापूर्वी काही सुडो सेक्‍युलर पक्ष होते,तर काही सेक्‍युलर पक्ष होते. त्यात आणखी एका पक्षाचे भर पडली आहे का असा प्रश्न पडावा, अशी सध्याची परिस्थिती आहे.

शेवटी शिवसेना अनेक काळ आमचा मित्र राहिला आहे. त्यांची प्रखर भूमिका बघितली आहे. सत्तेसाठी प्रखर भूमिका सोडणार नाही, अशी अपेक्षा आहे पण काय भूमिका घ्यावी हे शिवसेनेनेच ठरवावे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

जल्लोषात स्वागत 

विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे शहरात आगमन झाल्यावर नगर नाका, क्रांती चौक, आकशवाणी, आणि सेव्हन हिल येथे फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

आमदार अतुल सावे, नारायण कुचे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, संघटक भाऊराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com