धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची ४७ वर्षांची परंपरा खंडित, कोरोनामुळे साधेपणाने धम्म ध्वजवंदन

Buddha Leni Aurangabad1
Buddha Leni Aurangabad1

औरंगाबाद : युगप्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो विजयादशमीचा दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. बुद्धलेणी, धम्मभूमी परिसरात दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्सवी वातावरणात साजरा केला जातो; मात्र यंदा हा सोहळा कोरोना महामारीच्या सावटामुळे साधेपणाने होणार असून, ४७ वर्षांपूर्वींची परंपरा खंडित होणार आहे.


त्रिशरण, पंचशील ग्रहण करून बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना शरण गेले पाहिजे. यासाठी प्रत्येक वसाहतीमध्ये बुद्धविहार असली पाहिजेत, विहारात गेले पाहिजे हे विचार औरंगाबादमध्ये घराघरांत पोचवण्याच्या कामाची सुरुवात ४७ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानजीकच्या बुद्धलेणी परिसरातील धम्मभूमीतून झाली. या परिसराला भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या परिश्रमातून भव्यता लाभली आहे. मात्र यांची सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाली आहे. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील निवृत्त प्रा. डॉ. आर. एम. आंबेवाडीकर यांनी लिहिलेल्या बौद्ध लेणी यात्रेस सुरुवात कशी झाली या पुस्तकात म्हटले आहे, ४७ वर्षांपूर्वी बुद्धलेणीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता.

तो पूर्ण झाडाझुडपांनी वेढला होता. रात्रीच्यावेळी तर जाण्याची कोणाची हिंमत नसायची. अशा प्रतिकूल परिस्थितीत एका छोट्याशा कुटीमध्ये वास्तव्याला असलेले भन्ते उपाली पंडित, भन्ते खेमधम्मो व आणखी एक युवा भन्ते तथागतांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करत होते. पहिल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याच्या संयोजन समितीचे प्रमुख प्रा. एस. डब्ल्यू. राजभोज यांनी या सोहळ्याचे पूर्ण नियोजन केले होते. ते म्हणाले, २९ सप्टेंबर १९७१ रोजी पहिला सोहळा आम्ही साजरा केला. वामन निंबाळकर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. आंबेवाडीकर, मनोहर गरुड, टी. डी. डेंगळे, प्रा. माणिक सावंत, प्रा. एस. आर. हनुमंते, प्रा. प्र. ई. सोनकांबळे, डॉ. पी. बी. साळवे, श्रीधर साळवे, श्री. रोहनकर, व्ही. व्ही . गायकवाड, प्रा. बी. जी. रोकडे यांनी वस्त्यांमध्ये जाऊन या सोहळ्याविषयी जनजागृती केली होती. त्या सोहळ्याला युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय प्राचार्य म. भी. चिटणीस यांची उपस्थिती होती. त्यावेळी पहिल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याचे ३०० ते ४०० बौद्ध उपासक साक्षीदार बनले होते.

महाविहार बंदच
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यावर यंदा कोरोनाचे सावट आहे, येथील महाविहाराचे प्रमुख भदन्त विशुद्धानंद बोधी सध्या बुद्धगया येथे आहेत. भन्ते नागसेन बोधी थेरो यांनी सांगितले, कोरोनामुळे यंदा नेहमीप्रमाणे कार्यक्रम होणार नाहीत. सकाळी आठ वाजता धम्म ध्वजवंदन, नंतर महापरित्राण पाठ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम भिक्खुसंघाच्या उपस्थित होईल.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com