Diwali 2020 : यंदाची दिवाळी ऑनड्यूटी! डॉक्टर, नर्ससह कोवीड योद्धे रुग्णालयातच

coronavirus
coronavirus

औरंगाबाद : कोरोनाच्या कटू काळ सुरुच असताना असंख्य समस्यांना तोंड देत सामान्यजन जीवन सुकर, आनंदी होण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांची दिवाळी घरात उत्साहात साजरी होतानाच कोरोनाशी लढणारे असंख्य डॉक्टर्स, परिचारिका व इतर सर्व कोरोनायोद्धे मात्र अद्यापही रुग्णालयातच रुग्णसेवेत व्यस्त आहेत. यंदा खरेदीचेही नियोजन नव्हते, आमची दिवाळी ऑनड्यटी होती. अशा भावना या योद्ध्यांनी व्यक्त केल्या. कोरोनाच्या संकटात समस्तजन होरपळून निघाले आहेत. अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. डिसेंबरनंतर लाट येण्याची शक्यता पाहता समस्त डॉक्टर्स व आरोग्य विभाग पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.

त्यामुळेच डॉक्टर, नर्ससह इतर आरोग्यसेवकांच्या सुट्यांचा प्रश्‍न आहे. पण अशा काळातही तुरळक कर्मचारी व डॉक्टर्स वगळता सर्वच ऑनड्यूटी आहेत. कोवीड सेंटर, जिल्हा व घाटी रुग्णालयासह इतर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण भरती होत आहेत. रुग्ण भरती होणे व बरे होऊन जाणे ही प्रक्रीया सातत्याने होत आहे. त्यामुळे कोवीड सेंटर अथवा रुग्णालयात सर्व स्टाफला थांबावेच लागत आहे. सध्या ५८८ कोवीड रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रुग्णांचे दिवसातील दोन वेळीची तपासणी किंवा प्रकृतीत होणारी गुंतागुंत यामुळे चोवीस तास या योद्ध्यांना दक्ष राहावे लागत आहे. गंभीर रुग्णांचीही घाटीत मोठी संख्या आहे. त्यांच्याकडेही लक्ष देण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिकांची फौज कार्यरत असून या सर्वांना दिवाळीच्या सणाचा आनंद घेता आला नाही. त्यांची दिवाळी रुग्णालयातच गेली असून अनेकांनी या काळात मोठी तडजोड कुटुंबाशी केली आहे.

‘‘दिवाळीतील गर्दी पाहता पुढे काय होईल याची सर्व डॉक्टरांना चिंता आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीची दोन दिवस सुटी मिळाली पण ती ओपीडीसाठी होती, कोवीडसाठी सुटी नाही, आम्ही सर्व कार्यरतच आहोत. दिवाळी असली तरीही टेस्टींग चालु आहे. आमच्या सिडको एन-२ येथील सेंटरवरही टेस्टींग सुरुच असुन रुग्णांना फोन करणे, रुग्णालयात भरती आदी कामे सुरुच आहेत.’’
- डॉ. स्मिता कुलकर्णी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी.

‘‘यंदा कोवीड सेंटरला ड्यूटी आहे, त्यामुळे बाहेर जाता येणार नव्हते. त्यामुळे खरेदी करता आली नाही. दिवाळीचे कोणतेही नियोजन केले नाही. कोवीड सेंटरवर सलग चोवीस तास काम करुन काहींनी सुट्यांची तडजोड केली.’’ ः डॉ. संतोष राठोड, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय.

 


दिवाळी सुनीसुनीच !
उत्सवाचा राणी सण असलेली दिवाळी यंदा अनेकांच्या घरी सुनीसुनीच होती. कोरोनामुळे यंदा अनेकांच्या जिवाभावाची व्यक्ती आज या जगात नाहीत. त्यांच्या घरी यंदा दिवाळीचा सण नव्हता. तर सुमारे ५८८ पेक्षा जास्त रुग्णांचे नातेवाईक शहरातील कोवीड सेंटर व इतर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या दिवाळीवरही विरजण पडले. घाटी रुग्णालयात सध्यस्थितीत ६६ गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्या घरीही दिवाळीचे गोड पदार्थ यंदा झाले नाहीत.

आता कसली दिवाळी़!
‘‘कोरोनामुळे मी आणि माझे कुटुंबीय होरपळले. त्यातच कोरोनाने वडील गेले. आता कसली दिवाळी?’’ अशी दुखःद भावनाही उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णाने व्यक्त केल्या. अर्थातच ज्यांना कोरोनाचा सामना करावा लागला, आई, वडील, भाऊ, पती, पत्नी, मुलं कोरोनामुळे या जगात नाहीत त्यांच्या घरी दिवे मात्र यंदा लागले नाहीत.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com