चव्हाण यांना बिहारला पाठवून जिल्हा वाऱ्यावर सोडू नका, औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींचा विरोध

मधुकर कांबळे
Monday, 5 October 2020

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांना बिहारमध्ये पाठवून जिल्ह्याला वाऱ्यावर सोडण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, किंवा तेथील परिस्थिती आटोक्यात आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना बिहारमध्ये पाठवावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.

‘हॉटेल सुरु झाली, आता पर्यटनस्थळे खुली करा’

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून महिनाभरापुर्वी नियुक्ती करण्यात आली. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण या पार्श्वभूमीवर पदभार स्वीकारताच सुनील चव्हाण यांनी कामाला गती देत आवश्यक ते निर्णय तातडीने घेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होऊ लागली असतांना आता अचनाक जिल्हाधिकाऱ्यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवण्यात येत आहे. या संदर्भातील आदेश आले असून सुनील चव्हाण कुठल्याही क्षणी बिहारकडे रवाना होतील.

रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी औरंगाबादेत वाघ्या-मुरळीने केला जागर

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन आढावा घेतला जातो. सोमवारी (ता.पाच) झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बिहार निवडणूकीत निरीक्षक म्हणून पाठवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. जिल्हाधिकाऱ्यांना बिहारमध्ये निरीक्षक म्हणून पाठवू नये, त्याऐवजी ज्या जिल्ह्यात कोरोनाचा धोका, रुग्णांचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून पाठवावे, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't Sent Collector Sunil Chavan To Bihar, Political Leaders Oppose