Women's Day Special : खेड्यातील मुलगी अमेरिकेतील विद्यापीठात प्राध्यापक

Dr Dhanshri Thorat Success story
Dr Dhanshri Thorat Success story

नाचनवेल (जि. औरंगाबाद) -  नाचनवेल (ता. कन्नड) औरंगाबाद जिल्ह्यातील एक खेडे गाव. बहुतांश ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती. येथील कन्येने जिद्द, चिकाटी, प्रयत्नांच्या जोरावर परदेशी शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण पूर्ण केले. आता त्या अमेरिकेत मिसिसिपी विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. धनश्री थोरात असे त्यांचे नाव असून, इंग्रजी विषयाचे अभ्यासक अशोक रंगनाथ थोरात यांच्या त्या कन्या आहेत. 

डॉ. धनश्री यांना दहावीत ८८ टक्के गुण मिळालेले असताना आवड म्हणून त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून करिअर करण्याचा त्यांचा मानस होता. बारावीनंतर स्वतः इंटरनेटच्या माध्यमातून जॉर्जिया फाउंडेशनच्या  शिष्यवृत्तीचा त्यांनी शोध घेतला. यासाठी मोठी स्पर्धा असल्याचे त्यांना समजले. चिकाटीने अभ्यास करून पाच टप्प्यांमधील निवडीची प्रक्रिया त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या  शिष्यवृत्तीसाठी त्यांची निवड झाली. वर्ष २००७ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी धनश्री या शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाल्या. जॉर्जिया स्टेट विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळविली. नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी फ्लोरिडा विद्यापीठाने शिष्यवृत्ती दिली. २०१७ ला त्यांनी पीएच. डी. प्राप्त केल्यानंतर लगेच डॉ. धनश्री यांना कॅन्सस स्टेट विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल रिसर्चर म्हणून नोकरी मिळाली. ता. सहा ऑगस्ट २०१९ रोजी मिसिसिपी स्टेट विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या. २००७ ते २०१९ या बारा वर्षांच्या कालावधीत डॉ. धनश्री यांनी अमेरिकेतील शिक्षण क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. तेथील विविध विद्यापीठांतून
व्याख्यानासाठी, परिषदांमधून भाषण देण्यासाठी त्यांना सतत निमंत्रण येत असते. त्यांचे अभ्यासपूर्ण लेख जगभर वाचले जातात.

‘धरती’ या संस्थेच्या डॉ. धनश्री या संस्थापक सदस्य

भारतात डिजिटल ह्युमॅनिटीज या विषयातील तज्ज्ञांनी नुकत्याच स्थापन केलेला ‘धरती’ या संस्थेच्या डॉ. धनश्री या संस्थापक सदस्य असून, आपली जबाबदारी त्या यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. आयआयटी आणि भारत सरकारच्या इतर प्रतिष्ठित संस्थांमधून कार्यरत असलेल्या या तज्ज्ञांनी भारतातील उच्चशिक्षणाला कालसुसंगत दिशा देण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली आहे. सध्या डॉ. धनश्री या इंटरनेट क्षेत्रातील नव्या वसाहतीकरणावर संशोधन करीत आहेत. विविध खंडांतील अठरा देशांमध्ये अभ्यासपूर्ण माहितीसाठी समक्ष भेटींतून माहिती जाणून घेण्याचे काम हाती घेतले आहे. आजवर त्यांनी डिजिटल ह्युमॅनिटीज या विषयावर डेट्रॉईट विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, इंडियाना पोलिस विद्यापीठ, ओक्लाहोमा विद्यापीठ, नेब्रास्का विद्यापीठ आदी ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.

मराठवाड्यातील मुलीने जगातील सर्वच दृष्टीने समृद्ध मानल्या गेलेल्या अमेरिकेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगळी वाट चोखाळत स्वकर्तृत्वाच्या जोरावर सातासमुद्रापार छाप पाडणाऱ्या डॉ. धनश्री यांनी संधीचे सोने केले आहे. इंग्रजी भाषेची साधना, इंटरनेटची आराधना, उच्च ध्येयातून मिळालेली प्रेरणा हीच डॉ. धनश्री यांच्या यशाची त्रिसूत्री म्हणावी लागेल. आजच्या स्त्रियांसाठी प्रेरणा ठरावी असे त्यांचे काम आहे. त्यामुळेच त्यांचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com